Join us

अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:42 IST

एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली. मात्र जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली. मात्र जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. औषधांनी पोटदुखी कमी झाली नाही, तेव्हा डॉक्टरांनी महिलेचे एमआरआय स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. या स्कॅनमध्ये ती महिला गर्भवती असल्याचं दिसून आलं. परंतु १२ आठवड्यांचं बाळ महिलेच्या गर्भाशयात नाही तर तिच्या लिव्हरमध्ये वाढत आहे.

इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय?

मेरठ रेडिओलॉजिस्ट डॉ. केके गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ही अशा प्रकारची पहिलीच अनोखी घटना असू शकते. या स्थितीला 'इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी' असं म्हणतात. ही एक अतिशय दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे. सामान्य गर्भधारणेमध्ये, गर्भाशयाच्या आतील आवरणात गर्भ विकसित होतो, परंतु एक्टोपिक गर्भधारणेमध्ये, तो असामान्य ठिकाणी विकसित केला जातो. इंट्राहेपॅटिक एक्टोपिक गर्भधारणेमध्ये, गर्भ लिव्हरच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या आजुबाजूच्या भागात विकसित केला जाऊ शकतो.

या प्रकारच्या गर्भधारणेमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि लिव्हरचं नुकसान यासारखी गुंतागुंत होऊ शकते. लक्षणांमध्ये ओटीपोटात खूप वेदना, असामान्य रक्तस्त्राव आणि कधीकधी बेशुद्ध पडणं यांचा समावेश असू शकतो. अल्ट्रासाऊंड, एमआरआय किंवा इतर इमेजिंग तंत्रांचा वापर करून त्यावर उपचार केले जातात.

डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक

स्कॅन पूर्ण झाल्यानंतर, गर्भ आणि प्रभावित पेशी काढून टाकण्यासाठी लॅप्रोस्कोपी किंवा लॅप्रोटोमी सारख्या शस्त्रक्रिया आवश्यक असतात. ही स्थिती आईसाठी जीवघेणी असू शकते, म्हणून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. जोखीम घटकांमध्ये पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज, मागील एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भनिरोधक उपकरणांचा वापर यांचा समावेश असू शकतो.

भारतातील पहिलीच घटना

डॉ. गुप्ता यांच्या मते, आतापर्यंत संपूर्ण जगात अशा फक्त १८ प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतात कदाचित ही अशी पहिलीच घटना आहे. ही गर्भधारणा फक्त १४ आठवड्यांपर्यंतच ठेवता येते. म्हणजेच पुढील दोन आठवड्यात त्यांना शस्त्रक्रियेद्वारे महिलेच्या पोटातून हे बाळ काढावं लागेल. जर बाळाला शस्त्रक्रियेने आईपासून वेगळे केलं नाही तर महिलेच्या जीवाला धोका असू शकतो. माहिती मिळताच महिलेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे.  

टॅग्स : प्रेग्नंसीगर्भवती महिलाहेल्थ टिप्सडॉक्टरउत्तर प्रदेश