Join us

पाळीच्या तक्रारी, शांत झोपही येत नाही? करा ३ सोप्या हालचाली, राहाल फिट, त्रास होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 16:18 IST

Fitness Tips Yoga for Good Health : प्रसिद्ध योग प्रशिक्षक काम्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ३ सोप्या हालचाली सांगतात.

कोणत्याही स्त्रीला विचारलं तुझं अंग दुखतं का तर १० पैकी ८ स्त्रियांचं उत्तर हो असंच असतं. सकाळी झोपेतून उठल्यापासून सुरू असणारी त्यांची धावपळ रात्री सगळं घर झोपलं तरी चालूच असते. घरकाम, स्वयंपाक, ऑफीस, प्रवास हे सगळं करता करता शरीर पार थकून जातं. मात्र त्याच्याकडे बघायलाही आपल्याला वेळ होत नाही. व्यायामाला वेळ नाही असं म्हणत आपण रोजचा गाडा ओढत राहतो. मात्र रोजची कामं करता करता मधे ५-५ मिनीटे वेळ काढून काही सोप्या हालचाली केल्यास ही अंगदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होते (Fitness Tips Yoga for Good Health). 

इतकंच नाही तर पाळीच्या तक्रारी दूर होण्यासही या व्यायामप्रकारांचा चांगला उपयोग होतो. शांत झोप येत नसेल तरी जाता येता केले जाणारे हे व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात. प्रसिद्ध योग प्रशिक्षक काम्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ३ सोप्या हालचाली सांगतात. ज्या केल्याने अंगदुखी तर कमी व्हायला मदत होतेच पण स्नायूही बळकट राहतात. पाहूयात या हालचाली कोणत्या आणि त्यांचे काय फायदे होतात.

(Image : Google)

१. दोन्ही पायात खांद्याइतके अंतर घ्यायचे. हात मागे घेऊन एकमेकांमध्ये लॉक करायचे आणि श्वास घेऊन काटकोनात कंबरेतून खाली वाकायचे, वर येताना मान मागच्या बाजूला झुकवायची, पुन्हा खाली यायचे. असे किमान १० ते १५ वेळा करायचे. यामुळे पाळीच्या तक्रारी तसेच हार्मोन्सशी निगडीत तक्रारी, पीसीओडी, वंध्यत्व यांसारख्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठीही हा व्यायामप्रकार अतिशय गरजेचा असतो. 

२. दोन्ही पावलांवर खाली बसायचे, हाताचे तळवेही पुढच्या बाजुला जमिनीवर टेकवायचे. गुडघ्यातून उठून कंबरेतून वर यायचे, यावेळी मान आणि डोक्याचा भाग जमिनीकडे झुकलेला राहील. पुन्हा खाली बसायचे आणि पुन्हा वर उठायचे असे किमान १० वेळा तरी करायचे. यामुळेही पाळीच्या तक्रारी दूर होतात.

३. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून बटरफ्लाय पोजमध्ये आणायचे. हात डोक्याच्या वर रिलॅक्स ठेवायचे. पाय एकदा जांघेतून पूर्ण उघडायचे आणि गुडघे बाजूला जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. मग पुन्हा पाय मिटायचे आणि पुन्हा उघडायचे. असे १० ते १५ वेळा केल्यास यामुळे पाय, मणका अशा सगळ्याच स्नायूंना व्यायाम होण्यास मदत होते.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यफिटनेस टिप्सव्यायाम