Fibromyalgia : अलिकडेच साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री प्रिया मोहन हिने तिला झालेल्या एका दुर्मीळ आजाराबाबत खुलासा केला. ज्याचं नाव आहे फायब्रोमायल्जिया (Fibromyalgia). फायब्रोमायल्जिया हा एक क्रॉनिक आजार आहे. या गंभीर आजारात शरीरातील संपूर्ण स्नायू आणि हाडांमध्ये असह्य वेदना होतात. सतत थकवा जाणवतो, झोप लागत नाही किंवा सतत झोपमोड होते. तसेच स्मरणशक्ती कमी होते आणि मूड स्विंगही होत राहतात.
या आजारात मेंदू वेदनांचे संकेत ज्या पद्धतीने समजून घेतो आणि प्रक्रिया करतो त्यावरही परिणाम होतो. त्यामुळे वेदनांबाबत संवेदनशीलता अधिक वाढते. धक्कादायक बाब म्हणजे फायब्रोमायल्जियावर सध्या कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाहीत, मात्र योग्य औषधोपचार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात.
फायब्रोमायल्जियाची मुख्य लक्षणं
स्नायू-हाडांतील वेदना : संपूर्ण शरीरात वेदना जाणवणे, साधारणपणे ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या.
अतिशय थकवा : पुरेशी विश्रांती किंवा झोप झाल्यानंतरही थकवा जाणवणे.
झोपेतील अडथळे: खोल झोप न लागणे, वारंवार झोप तुटणे.
फायब्रो-फॉग : विसराळूपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, मानसिक स्पष्टता कमी होणे.
इतर लक्षणे: सकाळी शरीर आखडलेले वाटणे, डोकेदुखी, पचनाच्या तक्रारी (IBS), मूडमध्ये बदल, चिंता.
आजाराची कारणे
संशोधनानुसार मेंदू वेदनांच्या संकेतांवर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करतो हे या आजाराचं प्रमुख कारण मानलं जातं. कुटुंबात कोणाला हा आजार असल्यास धोका वाढू शकतो. तसेच शारीरिक किंवा भावनिक आघात जसे तीव्र ताणतणाव, एखादी सर्जरी तसेच इन्फेक्शनमुळेही हा आजार होऊ शकतो.
निदान आणि उपचार
या आजाराचं निदान करण्यासाठी नेमकी अशी कोणती ब्लड टेस्ट किंवा इमेजिंग टेस्ट उपलब्ध नाही. ३ महिन्यांहून अधिक काळ टिकणाऱ्या वेदनांसारखी लक्षणे आणि इतर आजार वगळून डॉक्टर निदान करतात. डॉक्टर वेदना कमी होण्यासाठी औषधं देतात. तसेच लाइफस्टाईलमध्ये बदल करून हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. जसे की, हलका व्यायाम, तणाव कमी करणे, पुरेशी झोप घेणे. तसेच फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि काउन्सेलिंगची सुद्धा यात मदत होते. योग्य उपचार, सातत्य आणि लाइफस्टाईलमधील बदलांमुळे फायब्रोमायल्जियाची लक्षणे नियंत्रित ठेवता येतात.
