पावसाळ्यात पायांवर काहीतरी बारीक उठायला लागते. पायावर एकदा चिखल्या झाल्या की मग ते पटकन जात नाहीत.हा तसा फार त्रासदायक प्रकार आहे. कारण चिखल्या आल्यावर दोन पावले चालतानाही झोंबते. सतत भिजलेले पाय, चिखलातून चालणे किंवा स्वच्छता राखण्यात झालेली हलगर्जी यामुळे त्वचेला
संसर्ग होऊ शकतो. आणि चिखल्या तयार होतात. या चिखल्या आधी फार खाजतात. खाजवल्यावर झोंबायला लागतात. तेवढा भाग दुखायला लागतो आणि काही वेळाने त्यात पस तयार होतो. यावर योग्य काळजी घेतली नाही तर संसर्ग वाढून गंभीर त्वचारोग देखील होऊ शकतो. डाग तसेच राहतात. पस झाल्यावर जखम होते आणि ती चिघळते. त्यामुळे वेळीच काळजी घ्यावी.
पावसात पाय सतत भिजल्यामुळे त्वचेचा वरील भाग कमकुवत आणि मऊ होतो. यामुळे बुरशी किंवा जीवाणू त्वचेत आरामात प्रवेश करू शकतात. यावर उपाय करण्याआधी पाय सतत कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शक्यतो पावसात बाहेर पडताना पाण्यापासून संरक्षण करणारी चपल किंवा गम बूट वापरणे फायदेशीर ठरते. पाय भिजल्यास लगेचच पाय साध्या स्वच्छ पाण्याने धुवायचे. पाय सतत धुत राहायचे. चपल धुवायला विसरु नका. पावसाळ्यात चपल सारखी धुवायची.
चिखल्या आल्यास त्या भागाला वारंवार स्पर्श करू नये. त्यावर स्वच्छतेसाठी अँटीसेप्टिक मलम लावा. घरगुती उपाय म्हणून हळद आणि नारळाचे तेल एकत्र करून लावल्यास जखम लवकर भरते. नारळाच्या तेलामुळे जागा मऊ होते आणि पस होत नाही. हळद उत्तम जंतुनाशक आहे. तसेच साजूक तूप लावा. गायीचे तूप असेल तर आणखी उत्तम. झोपण्याआधी लावा. फार गुणकारी असते.
काही वेळा ही लक्षणे फक्त पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाची नसतात. त्वचेच्या गंभीर आजाराची ही लक्षणे असू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅण्टीबायोटीक मलम किंवा गोळ्या घेतल्यास त्वरित आराम मिळतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. (feet blister solutions, important remedies to prevent skin diseases, easy remedies , skin care at home.)चुकीची चपल वापरणे टाळा. जखमेवर काही घासणार नाही याची काळजी घ्या. वेळीच बरी नाही झाली आणि पस वाढला तर त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. पावसात पायांची स्वच्छता, दररोज पाय धुवून सुकवणे आणि योग्य चपला वापरणे हाच मुख्य उपाय आहे. योग्य काळजी घेतल्यास चिखल्या येणे टाळता येते आणि पावसाचा आनंद घेताना पायांना त्रास होत नाही.