Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दिवसभर पेंग येते मात्र रात्री डोळे टक्क उघडे? खरं तर हे आहे झोप न लागण्यांचं मुख्य कारण ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2026 15:39 IST

Feeling sleepy all day but can't sleep at night? this is the main reason for sleeplessness : दिवसभर पेंगता पण रात्री जागेच. पाहा नक्की काय त्रास आहे.

दिवसभर पेंग येते, काम करताना जांभया येतात पण रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र डोळे टक्क उघडे असतात. काही केल्या झोप लागत नाही. ही आजकाल अनेकांच्या बाबतीत गंभीर समस्या होत चालली आहे. शरीर थकलेले असते, पण मन जागे असते. डोक्यात विचार असतात. (Feeling sleepy all day but can't sleep at night? this is the main reason for sleeplessness...)यामागे केवळ सवयी नाहीत, तर शरीराच्या नैसर्गिक घड्याळात झालेला बिघाड कारणीभूत असू शकतो. 

रात्री झोप न लागण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अनियमित दिनचर्या. उशिरापर्यंत मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश शरीरातील मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक हार्मोनचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे शरीराला झोपेचा नैसर्गिक संकेतच मिळत नाही. दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने घेतलेल्या डुलक्या देखील रात्रीची झोप उडवतात.

तणाव आणि चिंता हे देखील मोठे कारण आहे. दिवसभर मन व्यस्त असते, पण रात्री शांततेत विचारांची गर्दी वाढते. कामाचा ताण, भविष्यातील चिंता किंवा वैयक्तिक समस्या यामुळे मेंदू रिलॅक्स होत नाही. शरीर विश्रांतीच्या स्थितीत गेले तरी मन मात्र जागेच राहते. यासंदर्भात न्यूरोसायंटिस्ट Matthew Walker यांनी त्यांच्या Why We Sleep या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “The shorter your sleep, the shorter your life.” तसेच ते सांगतात की नियमित झोपेची वेळ पाळणे आणि रात्री कृत्रिम प्रकाश कमी पाहणे हे चांगल्या झोपेसाठी अत्यावश्यक आहे. त्यांच्या मते, दररोज एकाच वेळेला झोपणे आणि उठणे यामुळे मेंदूचे जैविक घड्याळ स्थिर राहते आणि झोप नैसर्गिकरित्या येऊ लागते.

अनियमित आहारही झोप बिघडवतो. संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये घेतल्यास मेंदू सतर्क राहतो. पचायला जड, तिखट किंवा उशिरा घेतलेले जेवण पचनसंस्थेवर ताण आणते आणि त्यामुळे झोप लागत नाही. व्यायामाचा अभाव आणि दिवसभर सूर्यप्रकाशात न जाणे यामुळेही झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे शरीर सक्रिय असावे.

झोप सुधारण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारता येतात. झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहणे, हलके वाचन किंवा ध्यान-प्राणायाम करणे, संध्याकाळनंतर कॅफिन टाळणे आणि दररोज किमान ३० मिनिटे चालणे यामुळे शारीरिक थकवा येतो आणि झोप चांगली लागते. दिवसभर पेंग येणे आणि रात्री झोप न लागणे हा शरीराचा इशारा आहे. योग्य वेळी सवयी बदलल्या आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर झोपेची समस्या नक्कीच सुधारु शकते. कारण चांगली झोप हीच निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daytime sleepiness, sleepless nights? Irregular routines cause sleeplessness.

Web Summary : Irregular schedules, screen time, stress, and diet disrupt sleep. Melatonin reduction from blue light is a key factor. Consistent sleep times, avoiding caffeine, and exercise can improve sleep quality.
टॅग्स : हेल्थ टिप्समानसिक आरोग्यआरोग्यहोम रेमेडी