बरेच लोक विविध गोष्टींना घाबरतात. काहींना झुरळाची, पालीची, सापाची भीती वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का की काही लोक मुंग्यांनाही घाबरतात? हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण खरं आहे. त्यांच्या शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असल्याने त्यांना मुंग्यांची भीती वाटते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका २५ वर्षीय महिलेने मुंग्यांच्या भीतीमुळे आत्महत्या केली. ४ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्यानुसार, ही महिला लहानपणापासूनच मुंग्यांना खूप घाबरत होती. महिलेने तिच्या आत्महत्येपूर्वी एक पत्रही लिहिलं होतं, ज्यामध्ये तिने "मला माफ करा, मी या मुंग्यांसह राहू शकत नाही. कृपया माझ्या मुलीची काळजी घ्या" असं म्हटलं आहे.
का वाटते मुंग्यांची भीती?
या स्थितीला मायरमेकोफोबिया म्हणतात. हा एक विशिष्ट फोबिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मुंग्यांबद्दल अत्यंत भीती वाटते. ही भीती इतकी तीव्र असते की मुंग्यांचा विचारही त्यांना खूप अस्वस्थ करतो. काही प्रकरणांमध्ये लोक मुंग्यांजवळ राहणं टाळतात, बाहेर जेवायला जाण्यास किंवा बागकाम करण्यास घाबरतात. मुंग्यांना घाबरणाऱ्या लोकांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणं आढळतात, जसं की वेगाने हृदयाचे ठोके, घाम येणं किंवा थरथरणं आणि मुंग्यांशी संबंधित ठिकाणं किंवा वस्तूंपासून लांब राहणं.
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
कोणत्या व्हिटॅमिनमुळे हे होते याचे अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु अनेक ठिकाणी हे व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे असू शकतं असा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिटॅमिन बी १२ नर्वस सिस्टम मजबूत करण्यास मदत करतं. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, स्मृतिभ्रंश आणि भीतीसारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा नर्वस सिस्टम कमकुवत होते तेव्हा लहान गोष्टींची देखील खूप भीती वाटते.
