आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विविध मार्ग अवलंबतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिशय घाईघाईत खाणं. अनेक लोक खूप वेगाने जेवतात, परंतु त्यांना या सवयीच्या दुष्परिणामांची कल्पना नसते. ही सवय नंतर एका मोठ्या समस्येचं कारण बनू शकते. घाईघाईत जेवल्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो, जो इतर शंभर आजारांचं मूळ मानला जातो. आजच्या काळात पोटात गॅस होणं ही एक सामान्य समस्या झाली आहे. अनेक लोक याकडे साधी गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु हे पचनसंस्थेतील बिघाड आणि बिघडलेल्या लाईफस्टाईलचे संकेत असू शकतात.
जेव्हा अन्नाचे नीट पचन होत नाही, तेव्हा आतड्यांमधील फर्मेटेशन प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि मिथेन यांसारखे गॅस तयार होतात. यामुळे पोट फुगणं, जडपणा जाणवणं आणि वेदना होणं अशा समस्या उद्भवतात. अनेकदा लोकांना हे समजत नाही की आरोग्यदायी आहार घेऊनही त्यांना गॅस आणि पचनाच्या समस्या का होत आहेत. पोटात गॅस होण्याची मुख्य कारणं म्हणजे तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचं अतिसेवन तर आहेच, पण त्यासोबतच घाईघाईत न चावता जेवणं हे देखील एक मोठं कारण आहे.
अन्न न चावता खाल्यामुळे अन्नासोबत हवाही गिळली जाते, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. आयुर्वेदानुसार, पचनशक्ती कमकुवत असणं, ताणतणाव, चिंता आणि अनियमित लाईफस्टाईल ही देखील गॅस होण्याची कारणं आहेत. याव्यतिरिक्त डाळी, सोडा असलेले ड्रिंक्स आणि रात्री उशिरा झोपणं ही देखील खराब पचनाची मुख्य कारणं आहेत. आयुर्वेदात गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत, ज्यामध्ये ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो.
पचनसंस्था अशी करा मजबूत
ओवा आणि काळं मीठ - कोमट पाण्यासोबत ओवा आणि काळं मीठ घेतल्यास गॅसची समस्या त्वरित कमी होऊ शकते.
आलं - आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा तुकडा देखील चावू शकता. यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
बडीशेप - जेवणानंतर बडीशेप चावून खाल्याने पचनसंस्था मजबूत होते.
हिंग - अनेक लोक हिंग पाण्यात टाकून पितात, ज्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
डॉक्टरांचा सल्ला
आयुर्वेदात योग्य लाईफस्टाईल हा शंभर समस्यांवरील उपाय सांगितला आहे. निरोगी लाईफस्टाईलसाठी जेवण नेहमी वेळ काढून, हळूहळू आणि चावून खावं. याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोपू नका, थोडा वेळ चालायला नक्की जा. जर तुम्हाला गॅसचा त्रास दीर्घकाळ असेल आणि तो खूप जास्त असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
