Water Drinking Tips : पाणी पिणं हे केवळ एक काम नसून जिवंत राहण्याची एक प्रक्रिया असतं. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलं जातं. कारण पाण्याशिवाय कुणीच जिवंत राहू शकत नाही. एक्सपर्ट नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. दिवसभर भरपूर पाणी प्याल तेव्हा शरीर योग्यपणे काम करतं. शरीरात जर पाणी कमी झालं तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर पाणी पिण्याची योग्य पद्धतही तुम्हाला माहीत असली पाहिजे.
पाणी पिण्याची योग्य पद्धत जर फॉलो केली गेली तर शरीराला एकापेक्षा एक फायदे मिळतात. अशात सायकॉलॉजिस्ट आणि हीलिंग एक्सपर्ट डॉ. मदन मोदी यांनी पाणी पिण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत सांगितलं आहे. त्यांनी पाणी पिताना चार नियम फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. हे नियम जर तुम्ही फॉलो केले तर चाळीशीतही तुम्ही पंचवीसचे दिसू शकता.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
एक्सपर्ट सांगतात की, तरूण दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावर नेहमीच ग्लो कायम ठेवण्यासाठी पाणी पिण्याचे चार नियम फॉलो केले गेले पाहिजे. हे नियम जर फॉलो केले तर आरोग्याला सुद्धा अनेक फायदे मिळतात.
सकाळी उठताच पाणी प्या
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळीच पाणी प्यायल्यानं शरीराला हायड्रेशन मिळतं आणि शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच चहा पिण्याची चूक करू नये यानं पोटासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. सकाळी उपाशीपोटी पाणी प्याल तर दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते. तसेच सकाळी पाणी पिण्याचा प्रभाव त्वचेवरही दिसून येतो.
एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये
जास्तीत जास्त लोक ही चूक करतात की, ग्लासभर पाणी घेतात आणि एका झटक्यात गटागट करून पितात. एक्सपर्ट सांगतात की, पाणी एक एक घोट घेत आणि आरामात खाली बसून प्यायला हवं. पाणी काही वेळ तोंडात ठेवून गुरळा करून प्यायला हवं, यानं जास्तीत जास्त लाळ पोटात जाते. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. पाणी उभं राहून कधीच पिऊ नये असाही सल्ला ते देतात.
थंड पाणी टाळावं
फार जास्त थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे. एक्सपर्ट सांगतात की, कितीही तहान लागली असेल तरी फ्रिजमधील जास्त थंड पाणी अजिबात पिऊ नये. उन्हाळ्यात मडक्यातील पाणी प्यावं. इतर दिवसांमध्ये तुम्ही नॉर्मल पाणी पिऊ शकता.
जेवण झाल्यावर लगेच पाणी न पिणे
जास्तीत जास्त लोक जेवण झाल्यावर लगेच पाणी पितात किंवा जेवण करता करता सुद्धा भरपूर पाणी पितात. पण असं पचनासाठी खूप नुकसानकारक ठरतं. कधीही जेवण झाल्यावर अर्ध्या तासांनंतर पाणी प्यायला हवं. तेव्हाच पचनक्रिया चांगली होते. खूप जास्तच गरज भासली तर जेवण झाल्यावर एक ते दोन घोट पाण्यानं तुम्ही गुरळ करू शकता.
सकाळी पाणी पिण्याचे फायदे
1) जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी प्यायला हवं.
2) सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त स्वच्छ होतं. रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते.
3) शरीराची स्वत:ची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करते. सकाळी पाणी प्यायल्यानं इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते.
4) जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांवर उपचार करण्यास मदत मिळते.
5) सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते.