Join us

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:17 IST

भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे.

भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून लोकांना कमी मीठ खाण्याचं महत्त्व पटवून देता येईल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाईल.

एका दिवसात किती खावं मीठ? 

WHO च्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. परंतु भारतातील लोक यापेक्षा जास्त मीठ खात आहेत. शहरांमध्ये लोक दररोज सुमारे ९.२ ग्रॅम आणि गावांमध्ये ५.६ ग्रॅम मीठ खात आहेत. हे प्रमाण WHO च्या सल्ल्यापेक्षा खूपच जास्त आहे. NIE चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरण मुरली म्हणाले की, कमी सोडियम असलेल्या मिठामध्ये सोडियम क्लोराईडऐवजी पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम मीठ मिसळलं जातं. त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होतं.

जास्त मिठाचे तोटे 

डॉ. मुरली म्हणाले, कमी सोडियम असलेले मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होतं आणि हृदय निरोगी राहतं. ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कमी सोडियम असलेलं मीठ वापरून ब्लड प्रेशर  सरासरी ७/४ mmHg ने कमी करता येतो. हा एक छोटासा बदल आहे, परंतु त्याचा परिणाम खूप मोठा आहे. येथे mmHg हे रक्तदाब मोजण्याचं एक युनिट आहे.

NIE चे आणखी एक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कुमार म्हणाले की, ते पंजाब आणि तेलंगणामध्ये एक प्रोजक्ट चालवत आहेत. या प्रोजेक्टमध्ये लोकांना कमी मीठ खाण्याचे फायदे सांगितले जातील. तसेच त्यांचं ब्लड प्रेशर आणि खाल्लेल्या मीठाच्या प्रमाणावर लक्ष ठेवलं जाईल. हा प्रोजेक्ट इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने केला जात आहे.

कमी सोडियमयुक्त मीठ वापरा

कमी सोडियमयुक्त मीठ वापरून आणि लोकांना जागरूक करून ही समस्या कमी करता येते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मीठाचा वापर कमी करावा. कमी मीठ खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, शास्त्रज्ञ लोकांना कमी मीठ खाण्यासाठी जागरूक करत आहेत.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स