Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उपाशीपोटी चुकूनही खाऊ नका 'हे' ७ पदार्थ; पोट बिघडून कधी आजारी पडाल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:54 IST

Empty Stomach Precautions : दुखणी खुपणी अंगाशी ओढून घेण्यापेक्षा उपाशी पोटी काय खाऊ नये, काय खावं याबाबत माहिती असायला हवी. 

निरोगी राहण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागते. सध्याच्या कोरोनाकाळात आजारी पडण्याची भीतीच वाटते. आजारांपासून लांब राहण्यासाठी  योग्य आहार, व्यायाम, चांगली झोप आणि जंक फूडपासून दूर राहणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य वेळी योग्य गोष्ट खाणे देखील महत्त्वाचे आहे. उपाशीपोटी  काही पदार्थांचे सेवन केले तर आजारांचा सामना करावा लागू शकतो.   दुखणी खुपणी अंगाशी ओढून घेण्यापेक्षा उपाशी पोटी काय खाऊ नये, काय खावं याबाबत माहिती असायला हवी. 

चहा आणि कॉफी

अनेकदा लोकांना सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करायला आवडते. उपाशीपोटी चहा प्यायल्याने गॅस किंवा एसिडिटीची समस्या होऊ शकते.  चहा किंवा कॉफी पिताना नेहमी चपाती किंवा बिस्किटे खा, यामुळे तुमचे पोट चांगलं राहिल. याशिवाय सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यानंतर कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यास उत्तम ठरेल.

सोडा

सोडा देखील कधीही रिकाम्यापोटी घेऊ नका. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने सूज येऊ शकते. तसेच, जास्त प्रमाणात सोडा असलेले कोल्ड्रिंक्स पिल्याने एसिडिटी होऊ शकते, जे नंतर अन्ननलिका कर्करोगाचे रूप घेऊ शकते. उपाशी पोटी लेमन सोडा पिणं टाळा कारण लेमन सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं. त्यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते.

पेरू

पेरू हे असेच एक फळ आहे जे सगळ्यांनाच खूप आवडते. पण लक्षात ठेवा की त्याच्या बियांमुळे अनेकांच्या पोटात वेदना होतात. विशेषत: जर ते रिकाम्या पोटी खाल्ले तर ते पोट खराब करू शकते. म्हणून शक्यतो रिकाम्यापोटी पेरूचे सेवन करणं टाळा.

तिखट खाणं

रिकाम्या पोटी मसालेदार अन्न खाल्ल्याने देखील पोटात अस्वस्थता येते. ज्यामुळे एसिडिटी किंवा वेदना सुरू होऊ शकतात. मसालेदार अन्नाचा तिखटपणा पोटासाठी त्रासदायक ठरू शकतो म्हणून रिकाम्यापोटी  काहीही तिखट खाऊ नका.

केळी

केळं खाण्याची अनेकांना सवय असते. पण उपाशी पोटी केळं खाल्ल्यास त्याचा शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. शरिरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी अधिक होते. त्यामुळेच त्याचा शरिराला त्रास होतो.

मादक पदार्थ

दारू ही शरिराला अपायकारक असतेच मात्र उपाशी पोटी दारुचे सेवन केले तर त्याचा अधिक त्रास होतो. तसेच पोटात जळजळ होते. अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही.

टोमॅटो

अनेक खाद्यपदार्थ तयार करताना टोमॅटोचा वापर केला जातो. तर काहींना कच्चा टोमॅटो खायला आवडतो. मात्र तुम्ही जर उपाशी पोटी खाण्याची सवय असेल तर थोडं थांबा कारण टोमॅटोमध्ये एसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उपाशी पोटी टोमॅटो खाल्लं असता त्याचा पोटाला त्रास होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य