अलीकडच्या काळात डोळे चुरचुरणे, कोरडेपणा, सतत लाल होणे हा त्रास अनेकांना जाणवतो आहे. अनेकदा लोकांना वाटतं की हा सगळा परिणाम लॅपटॉप, मोबाइल आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ बसण्याचा आहे. (Due to increased pollution, many people are suffering from red eyes in the cold season, see what to do )ही कारणे तर आहेतच पण त्याहून मोठं कारणंही आहे आणि ते म्हणजे वाढतं वायू प्रदूषण. सध्या विशेषतः दिल्लीसारख्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. हवेतले सूक्ष्म धुळीकण, धूर, रासायनिक वायू आणि विषारी घटक हे फक्त श्वसनतंत्रावर नाही, तर डोळ्यांवरही थेट परिणाम करतात.
या प्रदूषित हवेमुळे डोळ्यांच्या बाहेरील पडद्यावर धूळकण साचतात. त्यामुळे डोळ्यात कोरडेपणा येतो, चुरचुर होते, कधी कधी लालसरपणा आणि सूजही दिसते. थंड हवेतला कोरडेपणा या त्रासात आणखी भर घालतो. विशेषतः सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी प्रदूषणाची तीव्रता वाढलेली असते, ज्यामुळे डोळ्यांना सतत थकवा जाणवतो.
या परिस्थितीत डोळ्यांना विश्रांती देणं आणि त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. बाहेर जाताना नेहमी चष्मा किंवा सनग्लासेस वापरावेत, ज्यामुळे धूळ आणि धूर डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. घरात परतल्यावर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुणे हा साधा पण प्रभावी उपाय आहे. डोळ्यांवर गुलाबपाणी किंवा थंड काकडीचे तुकडे ठेवले, तर चुरचुर कमी होते आणि डोळ्यांना ताजेपणा येतो.
अतिशय प्रदूषित वातावरणात दिवसाचा बराच वेळ घालवावा लागतो तेव्हा शरीरात ओलावा टिकवणंही महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे पुरेसं पाणी प्यायचं, फळं आणि हिरव्या भाज्या खायच्या, आणि आहारात गाजर, बदाम, अळशी, तीळ यांसारख्या डोळ्यांना पोषक पदार्थांचा समावेश करायचा. हे पदार्थ डोळ्यांना आतून बळ देतात आणि प्रदूषणाच्या परिणामांपासून त्यांचं रक्षण करतात.
मोबाइल आणि लॅपटॉप वापर टाळता येत नाही, पण स्क्रीनपासून योग्य अंतर ठेवून बसणे शक्य आहे. वेळोवेळी डोळे मिटून विश्रांती घेणं आवश्यक आहे. दिवसातून काही वेळ डोळ्यांवर हात ठेवून हलकं दाब देणं किंवा हलक्या हाताने मसाज करणं देखील डोळ्यांचा ताण कमी करतं.
प्रदूषण वाढत असताना शरीरासोबतच डोळ्यांचीही काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतात सध्या जागोजागी प्रदूषण याविषयावरुन आंदोलने आणि जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. तरीही काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
