Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ऑफिसबाहेर प्लास्टिकच्या कपात चहा पिताय? सावधान... होऊ शकतात कॅन्सरसह जीवघेणे आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:36 IST

ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत बाहेरच्या टपरीवरून आलेला गरमा-गरम चहा, जो पॉलिथीनच्या पिशवीत किंवा पातळ प्लास्टिकच्या कपात थेट तुमच्या टेबलावर येतो, तो पिण्याची सवय तुम्हाला सुखावह वाटत असली तरी आरोग्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते.

ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत बाहेरच्या टपरीवरून आलेला गरमा-गरम चहा, जो पॉलिथीनच्या पिशवीत किंवा पातळ प्लास्टिकच्या कपात थेट तुमच्या टेबलावर येतो, तो पिण्याची सवय तुम्हाला सुखावह वाटत असली तरी आरोग्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा गरम चहा निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकमध्ये किंवा पॉलिथीनमध्ये टाकला जातो, तेव्हा त्यातील घातक केमिकल चहात विरघळू शकतात.

अमृता हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन आणि एंडोक्राइनोलॉजी तज्ज्ञ डॉ. मोहित शर्मा यांच्या मते, ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्यास फ्थॅलेट्स (Phthalates), बिस्फेनॉल ए (BPA) आणि स्टायरीन सारखे हानिकारक घटक चहात मिसळू शकतात. हे पदार्थ शरीरातील हार्मोन यंत्रणेवर परिणाम करतात आणि दीर्घकाळात गंभीर आजारांची शक्यता वाढवू शकतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, हे केमिकल 'एंडोक्राइन डिसरप्टर्स' म्हणून काम करतात, म्हणजेच ती इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन आणि थायरॉईड सारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकतात. जर एखादी व्यक्ती दिवसातून दोन ते चार वेळा असा चहा पीत असेल, तर कमी प्रमाणात का असेना, सातत्याने होणारा हा संपर्क शरीरावर घातक परिणाम करू शकतो. याचा परिणाम म्हणून हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व, वजन वाढणं, थकवा, निद्रानाश, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप-२ मधुमेह यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते यामुळे स्तन, प्रोस्टेट आणि थायरॉईड कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, मानवावरील मोठ्या प्रमाणावरील अभ्यासाला मर्यादा असल्या तरी, प्रयोगशाळेतील आणि प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की, ही केमिकल्स 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' वाढवून डीएनए (DNA) खराब करू शकतात, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. अलीकडील संशोधन अधिक चिंता वाढवणारी आहेत. काही अभ्यासांत असं आढळलं आहे की, डिस्पोजेबल कपात दिलेल्या गरम पेयांमध्ये हजारो मायक्रोप्लास्टिक कण असू शकतात. आयआयटी खडगपूरच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, दीर्घकाळ सिंगल-युज प्लास्टिक कप वापरल्याने मानवी शरीरात ग्रॅमच्या प्रमाणात प्लास्टिक जमा होऊ शकते. तसेच परदेशातील संशोधनात मानवी मेंदूच्या ऊतींमध्येही (Brain Tissue) मायक्रोप्लास्टिकचे अंश सापडले आहेत.

'बिझनेस स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, भारतात FSSAI ने 'फूड-ग्रेड' प्लास्टिक वापरण्याची परवानगी दिली आहे, परंतु प्रत्यक्षात स्वस्त आणि रिसायकल केलेले प्लास्टिक सर्रास वापरले जात आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला आहे की गरम चहा नेहमी काच, स्टील किंवा सिरॅमिकच्या भांड्यातच घ्यावा. कुल्हड (मातीचे कप) हा देखील एक सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Plastic cup tea: Health hazard, cancer risk, experts warn.

Web Summary : Drinking hot tea in plastic cups can release harmful chemicals, potentially causing hormonal imbalances, infertility, diabetes, and even increasing cancer risk. Experts advise using glass, steel, ceramic, or earthen cups instead.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स