Morning Water Drinking Habit : सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर पाणी पिणं खूप महत्वाचं असतं. अनेक हेल्थ एक्सपर्ट म्हणा किंवा घरातील मोठे लोक म्हणा सगळेच सकाळी झोपेतून उठल्यावर आठवणीने आधी पाणी प्यायला सांगतात. अलिकडे अनेक हेल्थ कॉन्शिअस लोक सकाळी कोमट पाणी पितात. तर काही लोक पाण्यात काहीतरी टाकून पितात. काही लोक असेही असतात जे सकाळी एक किंवा दोन ग्लास नाही तर एकाचवेळी लीटर लीटर भर पाणी पितात. पाणी पिणं शरीरासाठी आवश्यक आहेच, पण पिण्याची योग्य पद्धतही महत्वाची ठरते. अशाप्रकारे एकाचवेळी इतकं सारं पाणी प्यायल्याने शरीराला फायदे मिळतात असं नाही तर नुकसान होतात. सकाळी जास्त पाणी प्यायल्याने काय होतं ते जाणून घेऊया.
पचनशक्ती मंदावते
सकाळी उपाशीपोटी भरपूर पाणी प्यायल्याने पचन तंत्रावर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. सकाळी पचनासाठी आवश्यक अग्नि मंदावते, ती जागृत करण्याऐवजी जास्त पाणी प्यायल्याने अधिक मंदावते. मग नाश्त्यात खाल्लेल्या गोष्टी पचन होण्याऐवजी पोटात सडू लागतात.
बद्धकोष्ठता
जास्त पाण्यामुळे खाल्ले अन्न पचन न झाल्याने पोटात टॉक्सिन वाढू लागतात. शरीराला पोषण मिळत नाही आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या डोकं वर काढते.
जडपणा
जास्त पाणी प्यायल्याने होणारी तिसरी समस्या म्हणजे सकाळी सकाळी जास्त पाणी प्यायल्याने पोटावर दबाव पडतो. ज्यामुळे पोटात जडपणा जाणवतो आणि भूक कमी होते. बऱ्याच लोकांना जास्त पाणी प्यायल्याने पोटदुखीची देखील समस्या होते.
कसं प्यावं पाणी?
आयुर्वेदात पाणी पिण्यासंबंधी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आयुर्वेदात पाणी आपल्या प्रकृतीनुसार पिण्याचा सल्ला दिला आहे. पाणी ना कमी प्यावं ना जास्त प्यावं. जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्यावं. सकाळी सकाळी १ लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे. यामुळे जडपणा जाणवतो आणि उलटी होण्याची शक्यताही असते.
जशी तहान लागेल तसं पाणी प्यावं. पाणी नेहमी खाली बसून एक एक घोट घेत प्यावं. उभं राहून पाणी अजिबात पिऊ नये. याचा पचन तंत्रावर प्रभाव पडतो. ज्यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण थोडं वाढवलं पाहिजे. दिवसभर थोडं थोडं करत पाणी प्यायला हवं. दिवसातून साधारण २ ते ३ लीटर पाणी प्यावे.
