Tea-Coffee Side Effects : भारतीय लोकांना जेवढी चहाची सवय असेल, तेवढी इतर कुठे बघायला मिळत नाही. झोपेतून उठल्यावर फ्रेश होण्यासाठी आणि आळस दूर करण्यासाठी सगळ्यात आधी चहा घेतला जातो. बऱ्याच घरांमध्ये आता चहाची जागा कॉफीने घेतली आहे. चहा किंवा कॉफीशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. बरेच लोक तर झोपेतून उठल्या उठल्या बिछान्यावर गरमागरम चहा पितात. पण उपाशीपोटी हे पेय घेणं आरोग्यासाठी योग्य नाही. पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी उपाशीपोटी चहा-कॉफी न पिण्याची दोन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. चला तर मग तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
चहा-कॉफीचा ट्रेंड
डॉक्टर व्हिडिओमध्ये सांगतात की, भारतात उपाशीपोटी चहा पिणे म्हणजे बेड टी घेणं हा एक ट्रेंडच बनला आहे. मात्र ही सवय टाळली पाहिजे. त्यांनी यामागची दोन कारणे सांगितली आहेत, जी तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. कदाचित ही कारणे कळल्यानंतर आपण उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे बंद कराल.
वाढते अॅसिडिटी
डॉक्टरांच्या मते उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास अॅसिडिटी नक्कीच वाढते. कारण या पेयांमध्ये कॅफीन असते, जे अॅसिडिक घटक आहे. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी ही चूक अजिबात करू नये.
दुसरं मोठं कारण
डॉक्टरांनी सांगितलेलं दुसरं नुकसान अधिक गंभीर आहे. भारतातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शाकाहारी आहे आणि अशा लोकांमध्ये आधीच आयर्नची कमतरता आढळते. आयर्न कमी असल्यास शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) होऊ शकते, जे ताकदीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. रक्ताची कमतरता असल्यास अशक्तपणा, थकवा, डोळे व चेहरा फिकट दिसणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
आयर्न शोषणात अडथळा
चहा-कॉफीमधील कॅफीन आयर्नचे शोषण होऊ देत नाही. जर तुम्ही नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घेतली, तर शाकाहारी नाश्त्यात असलेले थोडेफार आयर्नदेखील शरीरात नीट शोषले जात नाही. त्यामुळे आयर्नची लेव्हल कमी होऊ शकते.
मग काय करावे?
जर आपण कधीमधी चहा-कॉफी पित असाल किंवा ही सवय सोडणे कठीण वाटत असेल, तर एक सोपा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते, चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी थोडेसे काहीतरी खावे. त्यानंतर किमान अर्ध्या तासाने चहा किंवा कॉफी प्यावी. यामुळे पोटावर आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
