After Meal Tips : बरेच लोक आजकाल आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणा किंवा फिटनेससाठी म्हणा वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. डाएट करणं असो, तेलकट पदार्थ टाळणं असो, गोड पदार्थ कमी खाणं असो असा गोष्टी करतात. पण या गोष्टी केल्यावरही बरेच लोक जेवणानंतर एक छोटीशी चूक करतात. ज्यामुळे आपली सगळी मेहनत वाया जाते. आज आपण ही चूक काय आहे हेच पाहणार आहोत.
डॉक्टर म्हणा किंवा घरातील मोठे लोक म्हणा नेहमीच सांगतात की, “जेवून लगेच झोपू नका” किंवा “जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका”. अशात डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी जेवणानंतर काय करावे याबाबत माहिती दिली आहे. जी आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.
काय आहे हा नियम?
जेवणानंतर फक्त २० मिनिटं हलक्या पावलांनी हळूहळू चालणं ही सवय लावा. महत्वाची बाब म्हणजे यासाठी ना जिममध्ये जावं लागेल, ना औषधं घ्यावी लागतील, ना सप्लिमेंट्स. फक्त रोजची ही एक छोटीशी सवय तुमचं शरीर जास्त काळ निरोगी ठेवू शकते.
जेवणानंतर चालण्याचे फायदे
ब्लड शुगर कंट्रोल
जेवणानंतर रक्तातील शुगर लेव्हल अचानक वाढते. पण २० मिनिटांचा वॉक हा स्पाईक २० ते ३० टक्क्यांनी कमी करू शकतो. त्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो आणि ज्यांना आधीपासून डायबिटीस आहे त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरतं.
पचन सुधारतं
जेवणानंतर बसून एकाजागी बसून राहिल्यानं किंवा झोपल्यानं गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. पण थोडं चालाल तर अन्न सहज पचतं आणि पोट हलकं वाटतं.
लठ्ठपणा कमी होतो
शरीरात इन्सूलिनचं प्रमाण वाढलं तर चरबी सुद्धा जास्त जमा होऊ लागते. वॉक केल्यानं हे अचानक वाढलेलं चरबीचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्यासही मदत मिळते.
हृदय निरोगी राहतं
जेवणानंतर ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते, जी हृदयासाठी घातक आहे. पण जेवणानंतर २० मिनिटं चालाल तर ही लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहतं.
अॅसिडिटी व छातीत जळजळ कमी होते
जड जेवणानंतर छातीत जळजळ, आबंट ढेकर येण्याची समस्या वाढते. अशात थोडा वेळ चालाल तर अॅसिड रिफ्लक्स बऱ्यापैकी कमी होतं.
कसे चालाल?
जेवणानंतर लगेच चालू नका, ५ ते १० मिनिटांनी हळूच चालायला सुरुवात करा. अगदी हळूहळू, आरामात चालावं. १५ ते २० मिनिटं चालणं पुरेसं ठरेल. रोज दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर ही सवय लावण्याचा प्रयत्न करा.
एकंदर काय तर जेवणानंतर फक्त २० मिनिटं चालणं खूप फायदेशीर असतं. औषधं न घेता, एक पैसाही खर्च न करता आपण डायबिटी, हृदयविकार, लठ्ठपणा आणि पचनाच्या तक्रारींपासून बचाव करू शकता.