Irregular Meal Timing Side Effects : तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी पौष्टिक आहार महत्वाचं आहेच. पण सोबतच रोजच्या जेवणाची वेळही तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळेच अनेक हेल्थ एक्सपर्ट जोर देऊन रोजच्या जेवणाची वेळ फिक्स करा असं सांगत असतात. जर रोजच्या जेवणाची वेळ पाळली नाही तर मेटाबॉलिज्म बिघडू शकतं. बरेच लोक 'जेवणाची वेळ जरा मागे-पुढे झाली तर असं काय होईल' असं म्हणत याकडे दुर्लक्ष करतात. अशात जनरल फिजीशियन आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी जेवणाची वेळ न पाळल्यामुळे होणारी एक मोठी समस्या सांगितली आहे.
डॉक्टर प्रियांका सहरावत सांगतात की, जर आपण रोज वेळेवर जेवण करणार नाही तर सतत होणारी डोकेदुखी आपला पिच्छा कधीच सोडणार नाही. असं बऱ्याच संशोधनातून सांगण्यात आलं आहे की, उपाशीपोटी राहिल्याने किंवा वेळेवर जेवण न केल्याने मायग्रेनची समस्या अधिक वाढते.
डॉक्टर सांगतात की, जर आपल्या मायग्रेनचं दुखणं डोक्यात सतत राहत असेल तर यात त्रास किती होतो हे आपल्याला माहीत असेलच. यात डोकं इतकं दुखतं की, कुणीतरी डोक्यावर मारत असल्याचं जाणवतं. मायग्रेनचा हा अॅटॅक आठवड्यातून दोन ते तीन दिवस राहू शकतो.
डॉक्टरांनी समजावून सांगितलं की, मायग्रेनचं दुखणं भलेही एक राहत असेल, पण या दुखण्यामुळे फोकस कमी होतो, थकवा जाणवतो, कमजोरी सुद्धा जाणवते. कशातही लक्ष लागत नाही. त्यामुळे पुढचे २ ते ३ दिवस आपण कामावर पूर्णपणे फोकस करू शकत नाही.
वेळेवर जेवण करा आणि डोकेदुखी मिटवा
जर केवळ रोज जेवणाची वेळ पाळून आपण मायग्रेनचं दुखणं कमी करू शकत असाल तर ही सवय नक्की फॉलो केली पाहिजे. आपणही काहीतरी खाऊन ऑफिसला गेलं पाहिजे आणि मुलांना सुद्धा खायला दिलं पाहिजे. डॉक्टरांनुसार, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे आणि वरून पोटभर न खाल्ल्यामुळे लहान मुलांमध्ये मायग्रेनची टेन्डेन्सी वाढत आहे.
