Migraine Cure: मायग्रेनची समस्या फारच त्रासदायक आणि लवकर बरी न होणारी आहे. मायग्रेनची समस्या सगळ्यात जास्त महिलांमध्ये बघितली जाते. यात अर्ध डोकं दुखतं, मळमळ, उलटी, प्रकाश आणि आवाजापासून खूप त्रास होणं ही मायग्रेनची कॉमन लक्षणं आहेत. अनेकदा तर उपचार घेऊनही आराम मिळत नाही. तुम्हाला सुद्धा नेहमीच मायग्रेनच्या दुखण्याचा सामना करावा लागत असेल तर एक्सपर्टनी यावर काही उपाय सांगितले आहेत.
डीएम न्यूरोलॉजी डॉ. प्रियंका सेहरावत यांनी मायग्रेनची समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, काही सवयी बदलून आणि लाइफस्टाईलमध्ये सुधारणा करून मायग्रेनचं दुखणं कमी करता येऊ शकतं.
डॉक्टरांनुसार, मायग्रेनचं दुखणं ट्रिगर होण्याची काही कारणं असतात. ही कारणं जर ओळखली तर त्रास टाळता येऊ शकतो. काही कॉमन ट्रिगर्समध्ये जास्त वेळ उपाशी राहणं, उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिणं, झोप कमी घेणं, उन्हात जास्त वेळ राहणं, मानसिक तणाव आणि मोठ्या आवाजात राहणं यांचा समावेश आहे.
काय उपाय करू शकता?
१) सगळ्यात आधी तर दिवसाची सुरूवात योग्य वेळेवर करा. सकाळी ९ वाजता नाश्ता करा आणि ४ तासांपेक्षा जास्त उपाशीपोटी राहू नका. उपाशीपोटी चहा किंवा कॉफी सुद्धा पिऊ नका.
२) प्रखर उन्हात जाण्याआधी डोकं टोपी किंवा स्कार्फनं झाका, गॉगल वापरा. उष्णता आणि प्रकाशामुळे मायग्रेनचं दुखणं ट्रिगर होतं. त्यामुळे बाहेर पडताना या गोष्टींची काळजी घ्या.
३) रात्रीची झोप खूप महत्वाची असते. रात्री उशीरापर्यंत मोबाइल किंवा टीव्ही बघितल्यानं झोपमोड होते. ज्यामुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते. रात्री कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते.
४) सतत तणावात राहणं हे मायग्रेनचं एक मुख्य कारण मानलं जातं. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी रोज काही वेळ एक्सरसाईज करा, योगा करा किंवा मेडिटेशन करा. यानं मानसिक तणाव कमी करण्यास मदत मिळते.
५) तसेच डॉक्टरांनी सांगितलं की, खूप जास्त आवाज असलेल्या ठिकाणांवर जाणं टाळा आणि मोठ्यानं बोलण्याचं देखील टाळलं पाहिजे.
डॉक्टर सांगतात की, हे छोटे छोटे बदल करूनही तुम्ही मायग्रेनचा त्रास कमी करू शकता. हे उपाय केल्यास तुम्हाला फक्त औषधांवर अवलंबून रहावं लागणार नाही. पण जर मायग्रेनची समस्या सतत होत असेल, आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.