सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये अनेक आजार लहान वयातच डोके वर काढतात आणि त्यात कँसरसारखा गंभीर आजारही आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. विशेषतः वयाच्या चाळिशीत कँसर होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही बाब चिंतेची आहे. बदललेली लाईफस्टाईल चुकीच्या सवयी, वाढता स्ट्रेस, आहारातील पोषणाची कमतरता आणि पर्यावरणीय घटक यांचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. अनेकदा सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केल्यामुळे कँसर उशिरा निदान होतो. त्यामुळे वेळेत सावधगिरी बाळगण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी चाळिशीत कँसर होण्यामागील प्रमुख कारणे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे(doctor reveals reasons for cancer in young people).
पूर्वी कॅन्सर हा वयाची साठी ओलांडलेल्या लोकांमध्ये आढळणारा आजार मानला जायचा. मात्र, बदलत्या काळानुसार हे चित्र भयावह रित्या बदललं आहे. आज आपली चाळिशी गाठलेली तरुण पिढी या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अधिक अडकताना दिसत आहे. कॅन्सर होण्यामागे केवळ तंबाखू किंवा सिगारेटच जबाबदार नसून, इतर ५ धक्कादायक कारणं आहेत जी आपण रोजच्या आयुष्यात नजरेआड करतो. विशेषतः ४० ते ४५ या वयोगटात हा आजार अधिक बळावत आहे. अनुवांशिकतेपासून ते रोजच्या (cancer rising rapidly in people under 40's doctor reveals 5 reasons) खाण्यापिण्यापर्यंत अशा ५ महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशींना आमंत्रण देतात त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात. डॉ. अभिनव नरवरिया यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, तरुणांमधील कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
वयाच्या चाळिशीत कॅन्सर होण्याची मुख्य ५ कारणं...
१. बदलती लाईफस्टाईल :- तासनतास एकाच जागी बसून काम करणे, जंक फूड आणि फास्ट फूड जास्त प्रमाणांत खाणे, आहारात साखरेचे वाढलेले प्रमाण आणि अपुरी झोप यामुळे शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होते. मद्यपान आणि सततचा मानसिक ताण शरीराची प्रतिकारशक्ती आतून पोखरत आहे. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड, मैद्याचे पदार्थ आणि फायबरची कमतरता असलेला आहार पचनसंस्थेवर ताण आणतो. गरजेपेक्षा जास्त अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे पोटातील 'चांगल्या बॅक्टेरियांचे' (Good Bacteria) नुकसान होते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि पर्यायाने कॅन्सरचा धोका वाढतो.
२. वायू प्रदूषण :- हवेतील PM2.5 सारखे सूक्ष्म आणि अतिशय धोकादायक प्रदूषक कण श्वासावाटे थेट फुफ्फुसांत शिरतात. हे कण शरीरात 'सूज' निर्माण करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. हे विषारी कण शरीरातील पेशींच्या DNA ला हानी पोहोचवतात. जेव्हा DNA मध्ये बिघाड होतो, तेव्हा पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि त्यातून कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते. वाहनांचा धूर, खराब हवा आणि घरांमध्ये खेळत्या हवेचा अभाव यामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे.
३. अनुवांशिकतेपेक्षा लाईफस्टाईल अधिक जबाबदार :- काही लोकांमध्ये कॅन्सरचा धोका हा BRCA जीन म्यूटेशन किंवा कुटुंबातील कॅन्सरच्या इतिहासामुळे असतो. मात्र, अशा प्रकरणांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. चुकीच्या सवयींमुळे ज्या कॅन्सर पेशी वयाच्या साठ किंवा सत्तरीनंतर सक्रिय व्हायला हव्या होत्या, त्या आता चाळिशीच्या आतच शरीरावर वाईट परिणाम करू लागल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, चुकीची लाईफस्टाईल कॅन्सरच्या प्रक्रियेला वेग देते.
४. आजाराची उशिरा होणारी ओळख :- बहुतांश तरुणांना असे वाटते की, कॅन्सर हा केवळ वृद्धांना होणारा आजार आहे. "आपल्याला इतक्या लवकर असा आजार होऊच शकत नाही," या मानसिकतेमुळे ते शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करतात. शरीरात होणाऱ्या छोट्या गाठी, अपचन, सततचा थकवा किंवा वजनातील घट यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांना तरुण पिढी कॉमन समस्या समजून घरगुती उपाय किंवा पेनकिलर्स घेऊन टाळतात. याच चुकीच्या विचारसरणीमुळे जेव्हा तरुण रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात, तेव्हा अनेकदा कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. वेळेवर निदान न होणे हेच मृत्यूदराचे मुख्य कारण ठरत आहे.
५. लक्षणांकडे दुर्लक्ष करणे :- डॉक्टरांच्या मते, कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे. शरीराच्या कोणत्याही भागात सतत वेदना होत असतील आणि औषधांनीही आराम मिळत नसेल, तर ते चिंतेचे कारण असू शकते. कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता जर अचानक वजन वेगाने कमी झाले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शौचावाटे रक्त येणे हे कोलन (आतड्याच्या) कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणारा खोकला किंवा थुंकीतून रक्त येणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. स्तनामध्ये किंवा काखेत कोणत्याही प्रकारची गाठ जाणवल्यास त्वरित मॅमोग्राफी किंवा तपासणी करून घ्यावी. सतत होणारे जुलाब, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगणे यांसारख्या सवयींमध्ये झालेला अचानक बदल. तोंडात असे फोड किंवा चट्टे जे औषधोपचार करूनही बरे होत नाहीत, हे तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
