तुम्हीही शिजवलेलं अन्न अॅल्युमिनियम फॉइल किंवा अॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवता का? बहुतांश घरांमध्ये उरलेल्या पोळ्या गुंडाळण्यासाठी, भाजी झाकण्यासाठी किंवा टिफिन पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करणे सामान्य बाब आहे. ही पद्धत सोपी, हलकी आणि झटपट वाटत असली, तरी ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे याचा कधी विचार केला आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
डिसेंबर २०२४ मध्ये 'फूड बायोसायन्स' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, जेव्हा मासे अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून उच्च तापमानावर भाजले गेले, तेव्हा फॉइलमधील धातू अन्नामध्ये उतरल्याचं दिसून आलं. संशोधकांना असं आढळलं की, फॉइलचा वापर जितका जास्त केला जातो, तितक्याच मोठ्या प्रमाणात हा धातू अन्नामध्ये मिसळतो.
दुसऱ्या एका संशोधनात असं दिसून आलं की, बेकिंग दरम्यान अॅल्युमिनियम फॉइलमुळे अन्नावर किती परिणाम होतो. यामध्ये आढळलं की सॉल्मन, मॅकरेल, चिकन, पोर्क, टोमॅटो आणि चीज यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांमधील अॅल्युमिनियमचे प्रमाण ४० पटीने वाढले होते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
या विषयावर डॉक्टरांचे म्हणणं आहे की, अॅल्युमिनियम फॉइल आणि कंटेनरचा चुकीचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम विशेषतः आंबट, खारट आणि मसालेदार पदार्थांशी जसं की टोमॅटो, लिंबू, व्हिनेगर, लोणचं आणि रस्सेदार भाज्या प्रक्रिया करतो. जेव्हा असे अन्न फॉइलमध्ये ठेवलं जातं किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलं जातं, तेव्हा धातू अन्नामध्ये मिसळू शकतो. डॉक्टर असा इशारा देतात की, दीर्घकाळापर्यंत शरीरात जास्त प्रमाणात अॅल्युमिनियम गेल्यामुळे हाडांच्या समस्या, किडनीवर ताण आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकार उद्भवू शकतात. विशेषतः किडनीच्या रुग्णांमध्ये हा धोका अधिक असतो.
रायपूरमधील प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट आणि कॅन्सर सर्जन डॉ. जयेश शर्मा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "गरम पोळी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळणं किती सुरक्षित आहे आणि किती हानिकारक? आपण दररोज लंच पॅक करण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी याचा वापर करतो. परंतु, जेव्हा अॅल्युमिनियम गरम केले जाते, तेव्हा ते अन्नात मिसळून किडनीला नुकसान पोहोचवू शकतं का, हा चिंतेचा विषय आहे."
अन्न सुरक्षित कसं ठेवावं?
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज स्वयंपाक करताना किंवा दीर्घकाळ अन्न साठवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर टाळा.
आंबट, खारट आणि मसालेदार अन्न फॉइलमध्ये ठेवू नका.
शिजवलेले अन्न स्टील, काच किंवा सिरॅमिकच्या भांड्यात ठेवा.
जर बेकिंग किंवा ग्रिलिंगसाठी फॉइल वापरावंच लागले, तर अन्न आणि फॉइलच्या मध्ये बटर पेपर किंवा बेकिंग पेपर लावा.
डिस्पोजेबल अॅल्युमिनियम कंटेनरचा पुनर्वापर (Reuse) करू नका.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, सोशल मीडियावरील ट्रेंड्सला बळी पडून अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती अवलंबून नका. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय निवडा.
