डोकं दुखणं हा सामान्य आणि नेहमीचाच त्रास आहे. मायग्रेनमुळे डोकं दुखतं. मात्र फक्त तेवढंच नाही, अनेकदा यामागे इतरही कारणे असतात. (Do you have a headache? Before taking any pills, know the causes of headache, ignoring it can be a dangerous)काही वेळा डोकं दुखणं हे आपल्या शरीराचा थकवा, मानसिक ताण किंवा चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये, कारण त्यामागे काही गंभीर कारणेदेखील असू शकतात.
डोकेदुखीचं एक प्रमुख कारण म्हणजे पित्त. जास्त तिखट, आंबट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पित्त असंतुलित होतं आणि त्याचा परिणाम डोक्यावर होतो. कपाळाच्या भागात किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना जाणवतात. असे सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या. अनेकांना ताणतणाव, चिंता आणि कामाचा भार यामुळेही डोकं दुखतं. सतत विचारात राहणं, झोप न लागणं किंवा कसलाही अति तण घेतल्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात असंतुलन निर्माण होतं आणि डोकं ठणकतं. याशिवाय उपाशी राहणं, अयोग्य वेळेला जेवणं किंवा पाणी कमी पिणं हेही डोकेदुखीला कारणीभूत ठरु शकतं.
झोपेचा अभाव हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण किंवा पुरेशी झोप न घेणे यामुळे शरीर आणि मेंदू थकतात. परिणामी सकाळी उठल्यावर डोकं जड वाटतं आणि दुखणं सुरू होतं. डोळ्यांचा ताणही या समस्येत मोठी भूमिका बजावतो. संगणक, मोबाइल किंवा टीव्हीसमोर बराच वेळ घालवणं, किंवा वाचन करताना कमी प्रकाशात बसणं यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी सुरू होते. काही वेळा महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळेही डोकं दुखतं. मासिक पाळीपूर्वी किंवा दरम्यान होणारे बदल डोक्यावर परिणाम करतात. याशिवाय हवामानातील बदल, धूर, आवाज, आणि प्रदूषण यांचाही परिणाम होऊ शकतो.
सतत आणि तीव्र डोकेदुखी असेल तर तिच्यामागे काही गंभीर कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायनसचा त्रास, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मेंदूत सूज किंवा रक्तप्रवाहात अडथळा यांसारख्या आजारांमुळेही डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःहून औषधं न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
