कधी कधी आपण रात्री वेळेवर झोपतो, पुरेशी झोप घेतो, तरी सकाळी उठल्यावर अंग थकल्यासारखं वाटतं, डोळे मिटतच राहतात आणि दिवसभर पेंग येते. अनेकांना वाटतं ही आळशीपणाची किंवा थकव्याची लक्षणं आहेत. पण प्रत्यक्षात ही शरीरातील किंवा जीवनशैलीतील काही असंतुलनाची लक्षणे असतात. (Do you feel sleepy even while sitting? It's not fatigue, it's a symptom of 'this' disease, get treatment on time)झोप हे फक्त विश्रांतीचं साधन नसून शरीरातील ऊर्जा पूर्ववत करण्याची प्रक्रिया आहे. जर ती व्यवस्थित झाली नाही, तर झोपूनही थकवा जाणवतो.
झोप जरी झाली तरी ती गाढ नसेल तर मेंदू आणि शरीराला खरी विश्रांती मिळत नाही. रात्री मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतं. या उपकरणांतून येणारा निळा प्रकाश (blue light) मेंदूला जागं ठेवतो, त्यामुळे झोप नीट होत नाही आणि सकाळी उठल्यावर सुस्ती येते.
ताणतणाव आणि मानसिक थकवा हे दुसरं मोठं कारण आहे. सतत चिंता, विचारांचा घोळ किंवा कामाचा दबाव यामुळे मेंदू विश्रांती घेत नाही. रात्री शरीर झोपतं पण मेंदू जागा राहतो. परिणामी, झोप पूर्ण झाली असं वाटतं पण सकाळी ताजेपणा जाणवत नाही. अयोग्य आहार देखील पेंग वाढवतो. जड, तेलकट, गोड किंवा अतितिखट अन्न सेवन केल्यास पचनास वेळ लागतो, ज्यामुळे झोपेची गती बिघडते. पाणी कमी पिणं (dehydration) मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम करतं, त्यामुळे डोकं जड आणि अंग सुस्त वाटतं. स्लिपअॅप्निया, थायरॉईड, ब्लड शुगर, डिप्रेशन यामुळेही पेंग येते.
सर्वप्रथम झोपेची दिनचर्या ठरवा. दररोज ठराविक वेळी झोपणं आणि उठणं याची सवय लावा. झोपण्याच्या एक तास आधी मोबाइल, टीव्ही किंवा तेज प्रकाश असलेली उपकरणं दूर ठेवा. शांत, अंधाराचं आणि थंड वातावरण झोपेसाठी सर्वोत्तम असतं. आहारात संतुलन ठेवा. रात्री पचायला हलकं अन्न घ्या. सूप, खिचडी किंवा दूध यासारखे पदार्थ झोपेसाठी फायदेशीर असतात. दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि तिखट, किंवा गोड अन्न कमी करा.
दररोज थोडा व्यायाम करा. चालणे, योगासनं, प्राणायाम किंवा हलकं स्ट्रेचिंग यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढतं, ऊर्जा मिळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. ताण कमी करण्यासाठी ध्यान, वाचन किंवा संगीत ऐकणं उपयोगी ठरतं. झोपण्याआधी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वरील उपाय केल्यानंतरही पेंग येत राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तातील लोह, थायरॉइड आणि जीवनसत्तव बी१२ची तपासणी करुन योग्य उपचार घ्या.
