Orthostatic Hypotension : अनेकदा काही लोकांना अचानक खुर्चीवरून उठून उभं राहिल्यावर किंवा पलंगावरून उठल्यावर एकदम चक्कर येते किंवा डोळ्यांसमोर अंधारी येते. पण बरेच लोक अशा समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. पण यामागे एक वेगळं कारणही असतं ज्याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन (Orthostatic Hypotension).
ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?
जेव्हा आपण बराच वेळ बसून किंवा झोपून असतो आणि अचानक उठून उभे राहतो, तेव्हा शरीरातील ब्लड प्रेशर काही क्षणांसाठी कमी होतं. कारण, उभे राहिल्यावर रक्ताचा फ्लो खाली म्हणजे पायांकडे साचतो. शरीराला ही स्थिती कंट्रोल करायला काही सेकंद लागतात. त्या दरम्यान आपल्याला डोकं हलकं होणं, चक्कर येणं किंवा डोळ्यांसमोर अंधारी दिसणं अशा समस्या होऊ शकतात.
कोणाला जास्त धोका असतो?
संशोधनानुसार, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 20% लोकांना हा त्रास होतो. वयानुसार शरीराच्या प्रक्रिया स्लो होतात, त्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये होणारे बदल ताबडतोब नियंत्रित करता येत नाहीत.
जर ही समस्या क्वचित होत असेल तर काळजीचं कारण नाही. पण जर नेहमीच किंवा जास्त वेळ चक्कर येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण असं वारंवार झालं तर अचानक बेशुद्ध होण्याचा धोका वाढतो.
चक्कर येण्यापासून बचावाचे उपाय
औषधं वेळेवर घ्या
ब्लड प्रेशर कमी करणारी औषधं घेत असाल तर ती वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद किंवा बदलू नका.
शरीर हायड्रेट ठेवा
डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सकाळी उठल्यावर चक्कर येऊ शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्या. मात्र झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नका, जेणेकरून रात्री लघवीसाठी पुन्हा पुन्हा उठावं लागणार नाही.
हळूहळू उठा
झोपेतून उठल्यावर किंवा बराच वेळ बसल्यानंतर लगेच उभं राहू नका. आधी काही सेकंद बसून हात-पाय हलवा, मग सावकाश उभे रहा. पायांच्या स्नायूंचा थोडा व्यायाम केल्यानं रक्त पुन्हा वरच्या दिशेने वाहू लागतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.
आहाराच्या सवयी बदला
काही लोकांना जेवल्यानंतर चक्कर येते, कारण पचनाच्या वेळी रक्त प्रवाह पोटाकडे वाढतो. त्यामुळे दिवसात तीन मोठ्या जेवणांऐवजी चार-पाच छोटे आहार घ्या. जास्त मैदा, पांढरी ब्रेड, तांदूळ आणि साखरेचे पदार्थ टाळा.
हलका व्यायाम करा
सकाळी हलका व्यायाम केल्यानं ब्लड प्रेशर सुधारतं आणि ऊर्जा टिकून राहते. बराच वेळ बसून राहिल्यास रक्त पायांमध्ये साचू शकतं, म्हणून मधूनमधून शरीर हलवत राहा.