Diwali Eye Safety Tips : दिवाळी (Diwali 2025) हा प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण आहे. पण फटाक्यांमधून निघणारा दाट धूर आपल्या दिवाळीच्या आनंदात खोडा घालू शकतो. या धुरामध्ये असलेले घातक केमिकल्सचे कण आपल्या डोळ्यांसाठी मोठं संकट ठरू शकतात. फटाक्यांच्या धुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि इतर हानिकारक केमिकल्स असतात, जे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज, अॅलर्जी आणि लालसरपणा निर्माण करू शकतात. खासकरून कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारे, वृद्ध आणि लहान मुलं यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. पण काही साध्या उपायांनी (Diwali Eye Safety Tips) आपण आपल्या डोळ्यांचं संरक्षण करू शकतो.
कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घालणं आवश्यक
जसं आपण फटाके हाताळताना हाताचं संरक्षण करतो, तसंच डोळ्यांचं संरक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नंबरचा चष्मा वापरत नसाल, तर सनग्लासेस किंवा अँटी-ग्लेअर चष्मा वापरा. यामुळे डोळे थेट धुराच्या संपर्कात येण्यापासून वाचतात आणि हवेत उडणाऱ्या सूक्ष्म कणांपासूनही संरक्षण मिळतं. बाजारात मिळणारे सेफ्टी गॉगल्स सर्वात उत्तम पर्याय आहेत.
घरात राहा आणि खिडक्या बंद ठेवा
जर तुमचे डोळे संवेदनशील असतील किंवा आधीपासून डोळ्यांचा आजार असेल, तर फटाके फोडण्याच्या वेळी घरातच राहणं सुरक्षित आहे. खिडक्या-दरवाजे बंद ठेवा, जेणेकरून धूर घरात येणार नाही. शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा, ज्यामुळे हवेतले हानिकारक कण फिल्टर होतील. रात्रीच्या वेळी फटाक्यांचा प्रदूषण स्तर सर्वाधिक असतो, त्यामुळे त्या वेळी बाहेर जाणं टाळा.
डोळ्यांमध्ये लुब्रिकेटिंग ड्रॉप्स वापरा
फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांमध्ये ड्रायनेस आणि जळजळ जाणवते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणं फायदेशीर ठरतं. हे ड्रॉप्स डोळ्यांमध्ये ओलावा टिकवून ठेवतात आणि जळजळ कमी करतात. मात्र, कोणतेही मेडिकेटेड ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका.
कॉन्टॅक्ट लेन्सऐवजी चष्मा वापरा
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी हा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. फटाक्यांच्या धुरातील केमिकल्स लेन्सवर चिकटतात, ज्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. तसेच धुरामुळे डोळे कोरडे पडतात, ज्यामुळे लेन्स आणखी त्रासदायक होतात. म्हणून दिवाळीच्या दिवशी लेन्सऐवजी चष्मा वापरणं अधिक सुरक्षित आणि आरामदायक आहे.
डोळे चोळू नका, थंड पाण्याने धुवा
जर धुरामुळे डोळ्यांत खाज, जळजळ किंवा लालसरपणा वाटत असेल, तर डोळे चोळू नका. त्याऐवजी थंड आणि स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने डोळे धुवा. स्वच्छ सूती कापडाने किंवा टिश्यूने डोळे पुसा. जर जळजळ, वेदना किंवा लालसरपणा कायम राहिला, तर ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दिवाळीचा आनंद राखायचा असेल, तर थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. धुरापासून डोळ्यांचं रक्षण करा, योग्य चष्मा वापरा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.