Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण! डेंग्यू बरा होतो पण काळजी घेतली नाही तर धोक्याचं कारण..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण! डेंग्यू बरा होतो पण काळजी घेतली नाही तर धोक्याचं कारण..

गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यू होऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यायला हवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 04:48 PM2024-05-22T16:48:27+5:302024-05-22T17:49:52+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यू होऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यायला हवी?

dengue fever symptoms treatment and care, how to take care for dengue | सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण! डेंग्यू बरा होतो पण काळजी घेतली नाही तर धोक्याचं कारण..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण! डेंग्यू बरा होतो पण काळजी घेतली नाही तर धोक्याचं कारण..

Highlightsडेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी उपचार व लस अद्याप उपलब्ध नाही.

डाॅ. संजय जानवळे, एम. डी. (बालरोगतज्ज्ञ)

मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात चालू वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात गेल्यावर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२३ ते ७ मे २०२३ दरम्यान डेंग्यूचे १५ हजार ३१२ संशयित रुग्ण आढळले होते. तर चालू वर्षात १ जानेवारी २०२४ ते ७ मे २०२४ दरम्यान राज्यात १८ हजार ८३४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. नुकताच ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ होऊन गेला. डेंग्यू संदर्भात जनजागृती करण्यासाठी तो दिवस असतो; मात्र डेंग्यूविषयी अनेक गोष्टी आजही अनेकांना माहिती नसतात.

डेंग्यू कशाने होतो ?

१. फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो.
२. एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. हे डास १०० ते २०० मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. त्यांच्या पाठ व पायावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना ‘टायगर माॅस्क्युटो’, असेही म्हटले जाते. घरात अंधाऱ्या जागी तसेच घराबाहेर थंड व अंधाऱ्या जागेतही त्यांचे वास्तव्य असते. अंडी, अळी, कोष व पूर्ण डास या त्यांच्या जीवनचक्राच्या अवस्था असतात. त्यापैकी पहिल्या तीन अवस्था पाण्यामध्ये असतात.
३. या डासांची उत्पत्ती साठवलेले स्वच्छ पाणी उदा. रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कुलर्स, कारंजी, फुलदाण्या इ. ठिकाणी होते. निरुपयोगी वस्तूंमध्ये साठलेले स्वच्छ पाणी उदा. नारळाच्या करवंट्या, डबे, बाटल्या, प्लास्टिकची भांडी, रिकाम्या कुंड्या, टायर अशा ठिकाणीही या डासांची पैदास होते.

४. डेंग्यू तापाच्या रुग्णास डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणत: ८ ते १० दिवसांत पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप येऊ शकतो. एकदा दूषित झालेला हा डास मरेपर्यंत दूषित राहतो. ५. डेंग्यूच्या विषाणूंमुळे प्लेटलेट घटतात. त्यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो व रक्तस्राव सुरू होतो, तसेच रक्तवाहिन्यांना गळती लागते व रक्तातील पाणी रक्तवाहिन्यातून बाहेर पडते त्यामुळे रुग्ण शाॅकमध्ये जाऊ शकतो.
६. सर्वसाधारण डेंग्यू ताप - यात थंडी भरून ताप येतो, डोके दुखते, सांधे व अंग दुखते, डोळ्याचे स्नायू दुखू लागतात. खांदे, कोपरा, मनगट, गुडघा, घोटे, लहान सांधे दुखायला लागतात. हालचाल मंदावते. पोटात दुखणे, उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणेही दिसू लागतात.
७. सात ते आठ दिवसानंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊ लागते. आजार साधारणपणे दहा दिवस राहतो.
८. हेमोरेजिक डेंग्यू फिव्हर - एकदा डेंग्यूची बाधा झाल्यानंतर परत दुसऱ्या उपजातीच्या विषाणूमुळे बाधा झाल्यास डेंग्यू तापाचा हा प्रकार दिसून येतो. सर्व अंगावर लालसर पुरळ उमटणे, नाकातून व हिरड्यातून रक्त येणे, रक्ताची उलटी होणे, शौचावाटे रक्त जाणे ही लक्षणे दिसून येतात. सगळ्यात धोकादायक म्हणजे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो.

९. डेंग्यू शाॅक सिंड्रोम - नाडीने ठोके तसेच नाडी क्षीण व्हायला लागते, रक्तदाब घटतो. शरीरात रक्तपुरवठा नीट होत नाही. नीट उपचार केले नाहीत तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
१०. फ्ल्यू किंवा इन्फ्ल्यूएन्झा तापामध्ये देखील ताप, सर्दी, अंग दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात. डेंग्यू तापाची लक्षणेही याहून वेगळी नसल्याने निदान करणे कठीण होते. अंग खूप दुखणे, हाडापर्यंत ताप गेल्यासारखा वाटणे, अंगावर लालसर पुरळ दिसणे, शरीरातील विविध भागांतून रक्तस्राव होणे अशी लक्षणे आढळल्यास मात्र डेंग्यू तापाची शंका येते.
११. हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंमुळे होत असल्याने ते मलेरियाच्या पॅरासाइट्स रक्तात दिसत नाहीत. त्यामुळे साध्या चाचण्यांनी निदान करणे कठीण असते. खात्री करण्यासाठी डेंग्यू फिव्हर ॲण्टीबाॅडीजची चाचणी करावी लागते. संशयित रुग्णाच्या रक्ताची स्थानिक स्तरावर डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे तपासणी करता येते. अशा रुग्णांमध्ये प्लेटलेटस्चे प्रमाण कमी, पांढऱ्या पेशीचे प्रमाण कमी, तसेच वाढलेले हिमॅटोक्रिट असते.

उपचार काय असतात?

डेंग्यूवर निश्चित असे उपचार नाहीत. इतर विषाणूजन्य आजाराप्रमाणेच डेंग्यू तापाचा उपचार लक्षणांवर अवलंबून असतो. भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे, हलका व समतोल आहार या बाबी उपचारामध्ये महत्त्वाच्या असतात. तापासाठी पॅरासिटामाॅल द्यावे लागते. गंभीर रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये भरती करून डाॅक्टरांच्या देखरेखीत उपचार करावे लागतात.

डेंग्यू होऊच नये म्हणून काय करायचं?

१. पूर्वी डेंग्यूतापाचे रुग्ण प्रामुख्याने पावसाळ्यात आढळत असत पण आता डेंग्यू हा आजार नित्याचीच बाब बनली आहे.
२. ग्रामीण भागात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठवून ठेवण्याच्या प्रथेमुळे व शहरी भागात अफाट बांधकामासाठी बांधलेले पाण्याचे हौद - यामुळे एडिस एजिप्ती या डासांची पैदास होते. या डासांमार्फत डेंग्यूला कारण ठरणाऱ्या विषाणूंचा संसर्ग होतो.

३. एडिस डास आता सर्वदूर पोहोचला आहे. डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी उपचार व लस अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे डेंग्यू होऊ नये म्हणून प्रतिबंध करणे अगत्याचे ठरते.
३ म्हणूनच साठवलेले पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलून कोरडे करा आणि नंतर त्यात स्वच्छ पाणी भरा. घरातल्या फ्लाॅवरपाॅटमध्ये असलेले पाणी आठवड्यातून एकदा बदला. आठवड्यातून एकदा कारंजी कोरडी ठेवा. साठलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्या.
४. जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बाटल्या इत्यादी वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावा. पाण्याच्या सर्व टाक्यांची झाकणे एकसंध घडीव लोखंडाची घट्ट बसणारी हवीत. सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करा. वापरात नसलेले हौद, पाण्याच्या टाक्यांत पाणी साठू देऊ नका.
 

Web Title: dengue fever symptoms treatment and care, how to take care for dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.