तुम्ही कधी विचार केला आहे का की, हवामान बदल फक्त वाढती उष्णता किंवा पुरांपुरता मर्यादित नाहीत. कारण आता आणखी एक अदृश्य धोका आपल्या दिशेने येत आहे. तो धोका म्हणजे खतरनाक फंगस, जो जीवावर बेतू शकतो. वाढतं तापमान आणि आर्द्रतेमुळे या फंगसला पसरण्याचा एक नवा मार्ग मिळाला आहे. येत्या काही वर्षांत ही समस्या जगभरात विनाश घडवू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
एस्परगिलस फ्युमिगेटस नावाचा हा फंगस युरोप, आशिया आणि अमेरिकेत वेगाने पसरत आहे. एका अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे या फंगससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे तो अधिक भागात पसरत आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की, जर आताही खबरदारी घेतली नाही तर लाखो लोकांना फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
ज्यांना आधीच दमा, सिस्टिक फायब्रोसिस किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती सारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी हा फंगस विशेषतः धोकादायक आहे. एस्परगिलस फ्युमिगॅटस उबदार आणि ओलसर वातावरणात वाढतो आणि त्याचे बीजाणू हवेत असतात, जे श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. सामान्य लोकांना याचा धोका कमी असतो, परंतु कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी हे जीवघेणं ठरू शकतं.
तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञ नॉर्मन व्हॅन रिन यांनी इशारा दिला की, आपण अशा टप्प्याकडे जात आहोत जिथे फंगल इन्फेक्शन सामान्य होईल. पुढील ५० वर्षांत, लोकांना कोणत्या फंगसची लागण होईल याचं चित्र बदलेल. धोकादायक म्हणजे हे फंगस कंपोस्टमध्ये आणि चेर्नोबिलसारख्या रेडिओएक्टिव्ह क्षेत्रातही टिकू शकतात. याचा अर्थ असा की ते अधिक प्रतिकूल परिस्थितीतही आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यास सक्षम आहे.
फंगसपासून कसा करायचा बचाव?
- बांधकामाची ठिकाणं आणि ओल्या जागांपासून दूर राहा.
- बागकाम करताना किंवा धुळीच्या ठिकाणी काम करताना मास्क घाला.
- घर स्वच्छ आणि हवेशीर ठेवा.
- जर तुम्हाला फुफ्फुसांशी संबंधित काही समस्या असतील तर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या.