उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक प्यायला सर्वांनाच आवडतं. थकवा दूर करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी लोक मोठ्या आवडीने कोल्ड ड्रिंक पितात. विशेषतः तरुण मुलामुलींमध्ये आणि महिलांमध्ये हा ट्रेंड अधिक दिसून येतो. पण एका रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, दररोज एक कोल्ड ड्रिंक प्यायल्याने महिलांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचा धोका सुमारे पाच पट वाढतो.
रिसर्चमध्ये १.६२ लाखांहून अधिक महिलांच्या खाण्याच्या सवयी ३० वर्षे ट्रॅक करण्यात आल्या. ज्या महिला दररोज किमान एक कोल्ड ड्रिंक पितात त्यांना तोंडाच्या कॅन्सरचा धोका महिन्याला एकापेक्षा कमी कोल्ड ड्रिंक पिणाऱ्या महिलांपेक्षा ४.७ पट जास्त असतो. धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिला धूम्रपान करत नव्हत्या किंवा मद्यपान करत नव्हत्या त्यांनाही याचा जास्त धोका होता.
कोल्ड ड्रिंकचा आरोग्यावर वाईट परिणाम
संशोधकांचा असा दावा आहे की गेल्या काही वर्षांत, धूम्रपान किंवा मद्यपान न करणाऱ्यांमध्येही तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे प्रोसेस्ड आणि अनहेल्दी फूडचा जास्त वापर करणं, ज्यामुळे शरीराला त्रास होतो. कोल्ड ड्रिंकचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, कॅन्सरचाही धोका वाढतो.
फक्त दातच नाही तर संपूर्ण आरोग्य धोक्यात
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, कोल्ड ड्रिंक फक्त दात खराब करतात किंवा लठ्ठपणा वाढवतात. परंतु या रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की त्याचे परिणाम शरीराच्या इतर भागांवर देखील गंभीर असू शकतात. विशेषतः महिलांवर याचा वाईट परिणाम होतो.