Curry leaves health benefits : भारतीय किचनमध्ये कढीपत्ता हमखास असतो. कारण याने पदार्थांना एक वेगळाच सुगंध मिळतो. सोबतच आरोग्यालाही याचे अनेक फायदे होतात. अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात कढीपत्त्यांचा वापर खूप आधीपासून केला जातो. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि त्वचे व केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. अशात आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या मदतीने पोटासंबंधी समस्या दूर करण्याची पद्धत आणि याचे फायदे सांगणार आहोत.
कढपत्ती चावून खाण्याचे फायदे
कढीपत्त्यामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स पोटाच्या समस्या जसे की, अल्सर, बद्धकोष्ठता आणि गॅस दूर करण्यास मदत करतात. रोज सकाळी कढीपत्त्याची काही पाने चावून खाल्ल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
तसेच कढीपत्त्याने लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासही मदत मिळते. याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. ज्यामुळे पोट साफ राहतं. कढीपत्त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते.
कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर असतो. यात व्हिटॅमिन ए, बी, आणि सी असतात. जे केस काळे आणि दाट राहण्यास मदत करतात. कढीपत्त्याने केसगळती रोखली जाते आणि डोक्याची त्वचाही निरोगी राहते. कढीपत्त्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्सने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. याने त्वचेची जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत मिळते. त्याशिवाय कढीपत्यातील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
कसं कराल सेवन?
- रोज सकाळी काही कढीपत्त्याची ताजी पाने चावून खावीत.
- कढीपत्ता चहामध्ये टाकूनही सेवन करू शकता.
- कढीपत्ता स्मूदी किंवा ज्यूसमध्ये टाकूनही सेवन करू शकता.
- वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांमध्ये, चटण्यांमध्ये कढीपत्त्या समावेश करू शकता.
कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात.