थंडी असो वा उन्हाळा, अनेकांना पायाला वारंवार भेगा पडण्याची समस्या भेडसावते. काहींच्या टाचांवर खोल भेगा पडतात, चालताना वेदना होतात आणि कधी कधी रक्तस्रावही होतो. (Cracked heels? A seemingly common problem turns out to be dangerous, see simple home remedies)पायाच्या भेगा फक्त दिसायला कुरूप वाटतात असे नाही, तर त्या त्वचेच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरु शकतात. अशा वेळी काही घरगुती उपाय आणि थोडी काळजी घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रणात आणता येते.
पायाला भेगा पडण्याची अनेक कारणे असतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणे. दिवसभर धूळ, माती, उघडे पाय ठेवणे किंवा खूप वेळ पाण्यात राहणे यामुळे पायातील ओलावा कमी होतो. चप्पल किंवा सँडल सतत घातल्याने टाचांना संरक्षण मिळत नाही आणि त्वचा फाटते. वयानुसार त्वचा लवचिकता गमावते, त्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक दिसते. काही वेळा जीवनसत्त्वांची कमतरता, विशेषतः ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स कमी असणे, यामुळेही पायाची त्वचा कोरडी पडते. मधुमेह किंवा काही त्वचारोग असल्यास भेगा वारंवार पडू शकतात.
या समस्येवर घरगुती उपाय फार उपयोगी पडतात. कोकम तेल हा त्यातला उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन हलकेसे कोकम तेल गरम करुन टाचांवर मालीश करा आणि मऊ सॉक्स घालावेत. हे तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि कोरडेपणा कमी करते. काही दिवसातच टाचांची त्वचा मऊ आणि सुंदर दिसू लागते.
अजून एक सोपा उपाय म्हणजे गरम पाणी आणि मीठ. एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालावे आणि पाय १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत. त्यानंतर पाय पुमिस स्टोनने हळूवार घासून मृत त्वचा काढावी आणि कोरडे करुन त्यावर तेल किंवा क्रीम लावावे. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास पाय खूपच मऊ होतात.
ग्लिसरीनही उत्तम परिणाम देते. ग्लिसरीन त्वचेतला ओलावा टिकवून ठेवते. झोपताना टाचांवर लावावे आणि काही वेळाने कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. 
याशिवाय रोजची थोडी काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्यावर तेल लावण्याची सवय लावावी. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे, कारण शरीरात ओलावा राहिला तर त्वचा कोरडी पडत नाही. शक्य तितके सॉक्स किंवा बंद चप्पल वापराव्यात, त्यामुळे धूळ-मातीशी संपर्क कमी होतो. कडक साबणांचा वापर टाळावा आणि आठवड्यातून एकदा तरी पायांचा स्क्रब करावे.



