वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला. अनेक देशांनी कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला. कोट्यवधी लोकांना याची लागण झाली. तसेच लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांनी कोरोनावर मात केली. याच दरम्यान कोरोना महामारीबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. एका रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे.
नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या एका नवीन रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसचा मेंदूवर भयंकर परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोना महामारीच्या काळात जगत असलेल्या लोकांचा मेंदू लवकर वृद्ध होऊ शकतो. लोकांना जरी व्हायरसचा संसर्ग झाला नसला तरी त्यांच्या मेंदूवर हा परिणाम दिसून येत आहे. २२ जुलै रोजी नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला होता. हा रिसर्च यूके बायोबँक स्टडीमधील डेटावर आधारित आहे.
कोरोना महामारी येण्याच्या आधी आणि नंतर जवळजवळ १,००० निरोगी लोकांच्या मेंदूचा स्कॅन करण्यात आला. या स्कॅनिंगनुसार, संशोधकांना मेंदूमध्ये वृद्धत्वाची चिन्हं आढळली, विशेषतः वृद्धांमध्ये, पुरुषांमध्ये आणि काही लोकांमध्ये हे दिसून आलं. या नमुन्यांपैकी कोरोनाची लागण झालेल्या लोकांची विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचं समोर आलं. एकूण व्यक्तींच्या स्कॅनचा रिव्ह्यू करण्यात आला त्यामध्ये त्यांच्या मेंदूच्या संरचनेत कोरोना महामारीच्या ताणामुळेच बदल झाल्याचं दिसून आलं.
संशोधकांच्या मते, हे बदल 'अंशतः उलट करता येण्यासारखे' असू शकतात. मात्र रिसर्चमध्ये कोरोना महामारीची अनिश्चितता आणि आयसोलेशनमध्ये जगत असल्याने मेंदूच्या आरोग्यावर किती परिणाम झाला हा अधोरेखित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच आपल्या मेंदूच्या वाढीसाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं यातून समोर आलं आहे.