सध्याच्या बिझी लाईफ स्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट साफ न होणं (Constipation Solution) ही कॉमन समस्या सर्वांनाच उद्भवत आहे. अनेकजण सकाळी पोट नीट साफ न झाल्यामुळे अस्वस्थ असतात. या समस्येवर मात करण्यासाठी बरीच औषधं उपलब्ध असली तरी स्वयंपाकघरातील ओवा आणि जीरं हे २ पदार्थ वापरून तुम्ही पाणी तयार करू शकता. हा अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे. (Health Benefits Of Drinking Ajwain Sauf Water For Gut Health)
ओवा आणि जीरं घातलेलं पाणी प्या
ओवा आणि जीरं या दोन्ही मसाल्यांमध्ये पाचक गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. ओव्यामध्ये थायमोल नावाचे घटक असतात जे पोटातील पाचक रसांना सक्रिय करतात तसंच गॅस, अपचनाच्या समस्येपासून दूर ठेवतात. जीरं हे शरीरातील मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी आणि पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी ओळखले जाते. जेव्हा आपण रात्री जेवल्यानंतर आणि झोपूण्यापूर्वी या दोघांचे मिश्रण कोमट पाण्यासोबत घेतो. तेव्हा ते रात्रभर पचनसंस्थेवर काम करते आणि सकाळी नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत होते.
ओवा आणि जिऱ्याचे पाणी कसे तयार करावे?
हे मिश्रण तयार करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जीरं घालून हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. पाणी कोमट असताना गाळून झोपण्यापूर्वी प्या. जर तुम्हाला पाणी उकळवायला वेळ नसेल तर ओवा आणि जीरं यांची भाजून पूड करून ठेवा आणि रात्री एक चमचा पूड कोमट पाण्यासोबत घ्या. या उपायामुळे फक्त बद्धकोष्ठता दूर होत नाही तर पोटातील जळजळ, आम्लपित्त आणि पोट फुगण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
नियमितपणे या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर आणि उर्जेवरही दिसून येतो. पण हा उपाय करताना दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.
आहारात मेथी, पालक, तांदूळ यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश करा. पेरू, पपई, सफरचंद आणि संत्री ही फळं पोट साफ करण्यासाठी उत्तम आहेत. मैद्याऐवजी कोंडायुक्त गव्हाचे पीठ, ओट्स, बाजरी किंवा नाचणी यांचा वापर करा.
