नारळ पाणी हे एक नॅचरल ड्रिंक आहे ज्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. नारळ पाण्यात कॅलरीज कमी असतात आणि त्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय त्यात थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी देखील आढळतं. नारळ पाण्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे अनेकांना वाटतं की ते वजन कमी करण्यास मदत करतं. पण खरं काय ते जाणून घेऊया...
हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ट्रेंड डॉ. सौरभ सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारळ पाण्याचा वजन कमी करण्यावर थेट परिणाम होत नाही. तुम्ही ते फक्त हेल्दी डाएट आणि चांगल्या लाईफस्टाईलचा भाग म्हणून पिऊ शकता, परंतु ते वजन कमी करणारं पेय नाही. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट आणि पोटॅशियम असतं जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि अॅसिड रिफ्लक्स आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करू शकतं.
इतकेच नाही तर अनेक संशोधनांनुसार, नारळ पाणी किडनी स्टोनच्या समस्येत देखील खूप उपयुक्त आहे. कमी साखर आणि जास्त पोटॅशियममुळे, नारळ पाणी स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून देखील काम करतं. डॉ. सेठी यांनी असंही म्हटलं आहे की, नारळ पाणी वजन कमी करण्यास, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास किंवा डिप्रेशन कमी करण्यास मदत करू शकतं, परंतु यावर अद्याप कोणतंही ठोस संशोधन झालेलं नाही. त्यामुळे याबद्दल काहीही सांगणं घाईचे ठरेल.
प्रौढ व्यक्ती दररोज एक कप नारळ पाणी पिऊ शकते. दुसरीकडे जर तुम्हाला किडनी, हृदय किंवा ब्लड शुगरची समस्या असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. नारळ पाणी हे एक नॅचरल ड्रिंक आहे, यात काही शंका नाही. परंतु ते वजन कमी करण्यास किंवा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतं की नाही हे आत्ताच सांगता येत नाही. म्हणून ते फक्त हेल्दी डाएटचा भाग म्हणून घ्या.