लहान मुलांना जंतांचा त्रास होणे ही अतिशय सामान्य पण पालकांना काळजी करायला लावणारी समस्या आहे. वाढत्या वयात मुलांची रोगप्रतिकारक क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते, शिवाय खेळताना, खाताना किंवा जमिनीवर बसताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे जंत होण्याची शक्यता वाढते. (children do get stomach worms, and the solution is also very simple - see the symptoms and try home remedies)हे जंत मुलांच्या पोटात राहून त्यांचे पोषण हिसकावून घेतात आणि त्यांचा एकूण विकास, भूक, झोप आणि ऊर्जा यावर परिणाम करतात.
जंतांचा त्रास मुख्यतः अस्वच्छ हात, अशुद्ध पाणी, मातीतील फळे–भाज्या, अर्धवट शिजलेले पदार्थ, तसेच नखे चावण्याची सवय या कारणांनी होतो. खेळताना मुले हातात माती घेतात, नंतर तेच हात तोंडाजवळ नेतात. त्यामुळे जंतांची अंडी शरीरात प्रवेश करतात. काही जंत रात्री सक्रिय होत असल्यामुळे मुलांच्या झोपेवर आणि भुकेवरही परिणाम होतो.
जंत झाल्याची काही विशेष लक्षणे लवकर ओळखता येतात. मुलं रात्री झोपताना दात चावतात, पोट गुडगुडते, सतत गुदद्वाराभोवती खाज येते, भूक कमी-जास्त होते, वजन नीट वाढत नाही, चेहरा निस्तेज दिसतो, आणि काही मुलं चिडचिड करतात तर काही सारखी थकतात. काही वेळा पोटदुखी किंवा ढेकरांचे प्रमाम वाढते. ही लक्षणे दिसू लागली की पालकांनी दुर्लक्ष करु नये.
जंत होऊ नयेत यासाठी स्वच्छता हाच सर्वात प्रभावी उपाय ठरतो. मुलांना हात धुण्याची सवय लावणे, नखे कापणे, जमिनीवर किंवा वाळूत खेळल्यानंतर हात लगेच धुणे या साध्या सवयी जंतांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करतात. पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करूनच द्यावे, तसेच फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच खायला द्यावीत. खेळणी स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरगुती उपायांपैकी काही उपाय जंत होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात. हळद आणि थोडेसे तूप घालून कोमट दूध पिणे शरीरातील सूज आणि जंत वाढण्याची प्रवृत्ती कमी करते असे मानले जाते. रिकाम्या पोटी थोडा गूळ आणि ओवा चघळल्याने पचन सुधारते आणि पोट हलके राहते. कोथिंबीर, तुळस, गाजर किंवा पपईसारखे पचनाला मदत करणारे पदार्थ आहारात ठेवले तर मुलांचे पोट स्वच्छ राहते. मात्र हे उपाय केवळ प्रतिबंधात्मक, जंतांची वाढ कमी करण्यासाठी असतात जंत झाल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधेच योग्य उपचार असतात. त्यामुळे लक्षणे ओळखा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
