कोरोना व्हायरसच्या काळात जेव्हा संपूर्ण जग एका अदृश्य व्हायरसची लढत होतं तेव्हा अनेक लोकांची इम्यूनिटी कमी झाली होती. मात्र या कठीण काळात जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी असल्याचं आता समोर आलं आहे. एका रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की, लॉकडाऊन दरम्यान जन्मलेल्या मुलांची इम्यूनिटी खूप मजबूत असल्याचं आढळून आलं आहे. इतर वेळी जन्मलेल्या मुलांपेक्षा ही मुलं खूपच कमी आजारी पडतात.
आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कने केलेल्या या रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, लॉकडाऊन दरम्यान जन्मलेल्या मुलांमध्ये फक्त ५% प्रकरणांमध्ये ऍलर्जी दिसून आली, तर पूर्वी ही संख्या सुमारे २२.८% होती. एवढंच नाही तर या मुलांची अँटीबायोटिक्सची गरजही खूपच कमी होती, एका वर्षात फक्त १७% मुलांना अँटीबायोटिक्स देण्यात आलं, तर सामान्यतः ही संख्या सुमारे ८०% असते.
लॉकडाऊनमधल्या मुलांमध्ये काय आहे खास?
संशोधकांचा असा विश्वास आहे की, या मुलांच्या पोटात असलेले मायक्रोबायोम (गुड बॅक्टेरिया) इतर मुलांपेक्षा बरेच वेगळे आहे. शरीराची इम्यूनिटी मजबूत करण्यात हे सूक्ष्मजीव खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळेच या मुलांना अॅलर्जी, इन्फेक्शन आणि इतर सामान्य आजारांपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळत आहे.
मायक्रोबायोम म्हणजे काय?
मायक्रोबायोममध्ये प्रत्यक्षात आपल्या शरीरात, विशेषतः आतड्यांमध्ये आढळणारे लाखो सूक्ष्मजीव असतात, जे आपल्यासाठी फायदेशीर असतात. नॅशनल इस्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, हे जीव आपले अन्न पचवण्यात, एनर्जी निर्माण करण्यात, इन्फेक्शनशी लढण्यात आणि इम्यूनिटी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
'या' गोष्टींचा झाला फायदा
लॉकडाऊन दरम्यान जग थांबलं होतं. ट्रॅफिक नव्हतं, औद्योगिक प्रदूषण नव्हतं, धूळ, माती नव्हती. याचा सर्वात मोठा फायदा या नवजात बाळांना झाला. प्रदूषण खूप कमी होतं, त्यामुळे मुलांची फुफ्फुसं स्वच्छ राहिली. व्हायरस आणि बॅक्टेरियाचा संपर्क अत्यंत कमी होता, ज्यामुळे त्यांची इम्यूनिटी कोणत्याही धोकादायक हल्ल्यांशिवाय विकसित होण्यास वेळ मिळाला. एक प्रकारे, या मुलांना नॅचरल अँटीबायोटिक, स्वच्छ हवा, शुद्ध वातावरण आणि शांत सुरुवात या गोष्टी मिळाल्या.