Protein Leakage in Urine: लघवीद्वारे आपल्या शरीरातील अनावश्यक आणि विषारी तत्व बाहेर काढले जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लघवीमधून काय काय बाहेर पडत आहे यावरून शरीरात काय गडबड सुरू आहे हे समजतं. म्हणजे शरीरातील बिघाडाची लक्षणं लघवीमधून दिसून येतात. असंच एक लक्षण म्हणजे लघवीतून प्रोटीन बाहेर पडणं. जर लघवीतून प्रोटीन बाहेर पडत असेल तर हा किडनीमध्ये गडबड असल्याचं संकेत असू शकतो. किडनी आपल्या शरीरातील फिल्टर असतात. ज्या रक्त साफ करतात. जेव्हा हे फिल्टर खराब होऊ लागतात, तेव्हा शरीरातील आवश्यक पोषक तत्व जसे की, प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडू लागतं.
कसं ओळखाल प्रोटीन जातंय बाहेर?
नॅचरोपॅथ आणि योगा एक्सपर्ट डॉक्टर सुधा रानी वर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात त्यांनी सांगितलं की, 'जर आपल्या लघवीमधून फेस येत किंवा रंग बदलत असेल तर हा किडनीमधून प्रोटीन बाहेर पडत असल्याचं संकेत आहे. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका'.
लघवीमधून प्रोटीन का जातं?
डॉक्टर सांगतात की, लघवीमधून प्रोटीन जाण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यातील काही खालीलप्रमाणे बघता येतील.
ब्लड प्रेशर वाढणं
शुगरची लेव्हल हाय होणं
जास्त स्ट्रेस घेणं आणि झोप कमी घेणं
किडनीवर सूज
जर यातील कोणतंही लक्षण दिसलं तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. कारण याकडे दुर्लक्ष केलं तर किडनी फेलिअरचा धोका वाढतो.
काय कराल?
नॅचरोपॅथी डॉक्टर सांगतात की, जर आपल्याही लघवीतून काही कारणानं प्रोटीन जात असेल किंवा लघवीत फेस तयार होत असेल, यावर काही नॅचरल उपायही केले जाऊ शकतात.
कटी स्नान
कटी स्नानला सिट्झ बाथ (Sitz bath) किंवा हिप बाथ (Hip bath) असेही म्हणतात, ही एक निसर्गोपचार पद्धती आहे ज्यामध्ये कंबर आणि खालचा भाग कोमट किंवा थंड पाण्यात बुडवला जातो. ३ मिनिटं गरम पाण्यात नंतर १ मिनिट थंड पाण्यात बसावं लागतं.
असं चार वेळा करावं लागतं. असं केल्यानं शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारतं. सूज कमी होते आणि किडनीची कार्यक्षमता वाढते. सोबतच यानं पोटाची समस्या, लिव्हरवरील सूज आणि नर्वस सिस्टीमची समस्या दूर होते.
काय काळजी घ्याल?
डॉक्टर सांगतात की, हा उपाय करताना पोट रिकामं असावं किंवा जेवण करून २ ते ३ तास झालेले असावेत. तसेच हा उपाय करताना डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवा आणि पाण्याचं तापमान शरीरानुसार ठेवा. डॉ. वर्मा यांच्यानुसार, जर हा उपाय नियमितपणे केला तर किडनीसंबंधी समस्या हळूहळू दूर होऊ शकते.