प्रत्येकालाच आपले दात चमकदार आणि हिरड्या निरोगी हव्या असतात. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि खळखळून हसता येतं. मात्र बऱ्याचदा आपण ब्रश करताना काही चुका करतो, ज्या आपल्याला कळतही नाहीत आणि त्यामुळे आपले दात आणि हिरड्या हळूहळू खराब होत राहतात.
बऱ्याचदा काही लोक तोंडाच्या स्वच्छतेला गांभीर्याने घेत नाहीत. अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने ब्रश करणं, योग्य टूथब्रश न वापरणं किंवा अनियमितपणे ब्रश करणं या सर्व सवयींमुळे दात किडणं, हिरड्या खराब होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या चुकांमुळे दातांच्या समस्या वाढू शकतात आणि नंतर उपचार करावे लागतात. अनेक लोक ब्रश करताना नकळत काही चुका करतात, ज्याबद्दल जाणून घेऊया...
जोरात ब्रश करणं
खूप जोरात ब्रश केल्याने दातांचा वरचा थर (इनॅमल) झिजतो आणि हिरड्या कमकुवत होऊ शकतात.
कडक ब्रश वापरणं
कडक ब्रश हिरड्यांना इजा पोहोचवू शकतो.
घाईघाईने ब्रश करणं
जर तुम्ही खूप लवकर, घाईघाईने ब्रश केलात तर दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत.
अनियमित ब्रश करणं
दिवसातून दोनदा ब्रश न करणं किंवा रात्री ब्रश न करता झोपणं हे दातांसाठी हानिकारक ठरू शकतं, कारण त्यामुळे रात्री जास्त बॅक्टेरिया वाढतात.
जुना ब्रश वापरणं
३-४ महिन्यांपेक्षा जास्त काळ ब्रश वापरू नका, कारण जुन्या ब्रशवर बॅक्टेरिया जमा होतात
दात आणि हिरड्यांचं यामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. जोरात ब्रश केल्याने इनॅमल खराब होतो आणि दात संवेदनशील होतात, ज्यामुळे गरम किंवा थंड अन्न खाताना वेदना होतात. हिरड्यांना सूज देखील येऊ शकते, दात किडतात. जुना ब्रश वापरल्याने तोंडात बॅक्टेरिया पसरतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी आणि इतर संसर्ग होऊ शकतात.
'अशी' घ्या दातांची काळजी
दात निरोगी ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने ब्रश करा. मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश निवडा आणि दिवसातून दोनदा किमान २ मिनिटं ब्रश करा. दात नीट स्वच्छ करा. जीभ आणि हिरड्या देखील स्वच्छ करा. दर ३-४ महिन्यांनी ब्रश बदला. फ्लॉसिंग आणि माउथवॉश वापरल्याने प्लाक निघून जातो. साखरेचे पदार्थ आणि कार्बोनेटेड ड्रिंक टाळा, कारण त्यामुळे दातांचं नुकसान होतं.