Join us

चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:05 IST

मेंदू खाणारा अमिबा जितका भीतीदायक वाटतो तितकाच खतरनाक आहे. हे इन्फेक्शन काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतं. मेंदू खाणाऱ्या अमिबाचं इन्फेक्शन कसं होतं, लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया....

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहेत. या वर्षी केरळमध्ये जवळपास ६९ प्रकरणं नोंदवली गेली आहेत, त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मेंदू खाणारा अमिबा जितका भीतीदायक वाटतो तितकाच खतरनाक आहे. हे इन्फेक्शन काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतं. मेंदू खाणाऱ्या अमिबाचं इन्फेक्शन कसं होतं, त्याची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया....

मेंदू खाणारा अमिबा म्हणजे काय?

मेंदू खाणाऱ्या अमिबाचे वैज्ञानिक नाव Naegleria fowleri असं आहे. हा सामान्यतः तलाव, नद्या, गरम पाण्याचे झरे आणि कधीकधी स्विमिंग पूल यासारख्या ठिकाणी आढळतो. हा अमिबा उष्णतेमध्ये वेगाने वाढतो.

या इन्फेक्शनमुळे प्रायमरी एमीबिक मेनिनजोएन्सेफलाइटिस (PAM) नावाचं ब्रेन  इन्फेक्शन होतं. त्यावरूनच त्याला मेंदू खाणारा अमिबा असं नाव पडलं. तो एकदा मेंदूपर्यंत पोहोचला की, मेंदूच्या टिश्यूना नुकसान पोहोचवतो.

लक्षणं काय आहेत?

या इन्फेक्शनची लक्षणं सामान्यतः पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर १ ते ९ दिवसांनी दिसतात. सुरुवातीची लक्षणं सामान्य व्हायरल ताप किंवा मेनिनजोएन्सेफलाइटिससारखीच असतात, ज्यामुळे ते ओळखणं कठीण होतं, परंतु नंतर लक्षणं वेगाने वाढतात.

सुरुवातीची लक्षणं (पहिले ५ दिवस) 

- डोकेदुखी - ताप - मळमळ आणि उलट्या - थकवा आणि अशक्तपणा

नंतरची गंभीर लक्षणं (५ व्या दिवसानंतर) 

- आकडी येणं - गोंधळून जाणं - लक्ष केंद्रित करण्यात अडचण - संतुलन बिघडणं - कोमामध्ये जाणं

चिंतेची बाब म्हणजे हे इन्फेक्शन खूप वेगाने वाढतं आणि सामान्यतः लक्षणं सुरू झाल्यापासून १ ते १८ दिवसांच्या आत मृत्यूला कारणीभूत ठरतं. म्हणून जर एखाद्याला जास्त ताप आणि डोकेदुखी होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकेरळहॉस्पिटल