Black Coffee for Liver : लिव्हर जर निरोगी राहिलं तर आपलं शरीर निरोगी राहील. कारण लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरची एक खास बाब म्हणजे लिव्हर स्वत:ला रिपेअर करू शकतं. पण जर आजार मोठा आणि अधिक वाढला असेल तर मग समस्या वाढते. लिव्हरसंबंधी एखादा गंभीर आजार झाला तर लिव्हरची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं ठरतं. अनेक डॉक्टर लिव्हरच्या रूग्णांना ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला देतात. रोज ब्लॅक कॉफी प्यायल्यानं लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) आणि लिव्हर सिरोसिसचा धोका बराच कमी होत असल्याचं सांगितलं जातं.
लिव्हरसाठी वरदान ब्लॅक कॉफी
कॉफी केवळ झोप उडवण्याचं किंवा फ्रेश वाटण्यासाठीच नाही तर लिव्हरसाठी औषधासारखं काम करते. दिवसातून ३ कप ब्लॅक कॉफी लिव्हर सिरोसिसचा धोका आणि लिव्हर कॅन्सरचा धोका ४० टक्क्यांनी कमी करते, असा दावा अनेक डॉक्टरांनी केला आहे. कॉफीमध्ये आढळणारे अॅंटी-ऑक्सीडेंट्स लिव्हरला नवीन जीवन देण्यास मदत करतात. या फायद्यांसाठी विना दुधाची, क्रीम आणि विना साखरेची कॉफी प्यावी.
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर घातक
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही एक खूप घातक समस्या आहे. कारण बरेच दिवस याची लक्षणं दिसून येत नाहीत. यात लिव्हर डॅमेज होतं. असं अजिबात नाही की, केवळ दारू प्यायल्यानेच लिव्हर फॅटी होतं. जे दारू पित नाहीत, त्यांनाही फॅटी लिव्हरची समस्या होते. आजकाल तीनपैकी एका व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या आढळून येते.
लिव्हर कसं खराब होतं?
आपण जे काही खातो ते पचवण्याचं काम लिव्हर करतं. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वेदना कमी करणारी औषधं घेतली तर लिव्हरचं नुकसान होऊ शकतं. तेच जास्त काळ एखादं खास औषध घेतलं तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे औषधं नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
केवळ जेवणच नाही तर झोपही थेटपणे लिव्हरला प्रभावित करते. झोप जर बरोबर पूर्ण होत नसेल तर लिव्हरच्या आरोग्यावर याचा प्रभाव पडतो. यानं मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि लिव्हरमधील विषारी तत्व बाहेर पडत नाहीत. त्यामुळे रोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.
जर आपण नेहमीच रात्री उशारी जेवण करत असाल तर यामुळे लिव्हरचा स्ट्रेस वाढतो आणि लिव्हरची टॉक्सिन सायकल प्रभावित होते. ज्यामुळे लिव्हरवर फॅट जमा होतं. त्यानंतर शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात.