लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही अनेकदा फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असते. ही एक सामान्य सवय वाटत असली तरी, हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या एका डॉक्टरांनी या सवयीमुळे आरोग्यविषय गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात असा इशारा दिला आहे. नखांच्या खाली असलेल्या जंतूंमुळे विविध प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं, अगदी साध्या सर्दी-खोकल्यापासून ते गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.
नखं खाण्याची सवय का आहे धोकादायक?
जंतूंचा प्रसार
आपण आपल्या हातांनी, बोटांनी अनेक वस्तूंना स्पर्श करतो, जसं की दरवाज्याचं हँडल, पैसे, स्मार्टफोन इत्यादी. त्यामुळे त्याठिकाणी असलेले जंतू बोटांना लागतात. नखांखाली मोठ्या प्रमाणात जंतू जमा होतात. अशातच नखं खाल्ल्याने हे जंतू थेट तोंडातून शरीरात जातात.
इन्फेक्शन
नखं खाताना बोटांच्या त्वचेला सूक्ष्म भेगा पडतात, ज्यातून जंतू शरीरात प्रवेश करतात. यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. उदा. साल्मोनेलासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
मानसिक संबंध
तज्ज्ञांनुसार, नखं खाण्याची सवय अनेकदा तणाव किंवा कंटाळा आल्यावर एक प्रकारे सांत्वन मिळवण्याची क्रिया असू शकते. काहीवेळा ही सवय 'ऑब्सेसिव-कंपल्सिव्ह डिसऑर्डर' (OCD) सारख्या मानसिक विकारांशी देखील जोडलेली असू शकते.
कशी मोडायची सवय?
जागरूक राहा - नखं खाण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी तुम्ही नेहमीच जागरूक असणं आवश्यक आहे.
थेरपी - बेहेव्हिअर थेरपी आणि रिलॅक्सेशन टेक्निक वापरून ही सवय कमी करता येते.
स्वतःची काळजी - पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यासारख्या गोष्टी तणाव कमी करण्यास मदत करतात.
डिटरेंट वापरा - बाजारात मिळणाऱ्या कडू चवीच्या नेलपॉलिशचा वापर केल्यानं नखे खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
जर ही सवय खूप त्रासदायक ठरत असेल किंवा त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक समस्या निर्माण होत असतील, जसं की इन्फेक्शन, चिंता किंवा आत्मविश्वासाची कमी, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.