Birthmarks Cause and Facts : आपण पाहिलं असेल की, काही लहान मुलांच्या शरीरावर काही बर्थमार्क म्हणजेच जन्मखूणा असतात. बऱ्याच लोकांच्या शरीरावर जन्मताच काही चट्टे, तीळ किंवा काळ्या किंवा इतरही रंगाचे डाग असतात. या बर्थमार्कला काही लोक नशीबाची खूण मानतात. तर काही लोक सौंदर्याची ओळख समजतात. प्रत्यक्षात या खुणांना बर्थमार्क म्हणतात आणि जवळजवळ प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तरी त्या आढळतात.
बर्थमार्क ही त्वचेवर दिसणारी अशी खूण असते, जी जन्माच्या वेळीच अस्तित्वात असते. काही वेळा ती जन्मानंतर काही दिवसांनी किंवा महिन्यांनीही दिसू लागते. बर्थमार्क वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे असू शकतात. काही खुणा वय वाढत गेल्यावर कमी होतात, तर काही आयुष्यभर तशाच राहतात. जास्तीत जास्त बर्थमार्क हे सामान्य असतात आणि त्यातून वेदना होत नाहीत किंवा त्यांची कशी काही अडचण नसते. मात्र काही विशिष्ट प्रकारचे बर्थमार्क, जसे काही जन्मजात तीळ पुढे जाऊन त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
जर एखाद्या बर्थमार्कच्या रंगात, आकारात बदल दिसत असेल, तसेच त्यात खाज, वेदना किंवा रक्तस्राव होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तात्काळ डॉक्टर किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशात आज आपण हे बर्थमार्क का येतात किंवा ते गंभीर कधी समजायचे आणि ते काढता येतात का हे समजून घेऊया.
बर्थमार्क का तयार होतात?
बर्थमार्क तयार होण्यामागे कोणतंही एक ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र डॉक्टरांच्या मते खालील काही कारणांमुळे त्वचेवर बर्थमार्क दिसू शकतात.
- गर्भावस्थेत बाळाच्या विकासादरम्यान रक्तवाहिन्यांची योग्य रचना न होणे, त्यामुळे व्हॅस्क्युलर बर्थमार्क तयार होतात.
- त्वचेला रंग देणाऱ्या पेशी एका ठिकाणी जास्त प्रमाणात जमा होणे, ज्यामुळे पिगमेंटेड बर्थमार्क दिसतात.
- कुटुंबात कुणाला बर्थमार्क असणे, म्हणजेच जेनेटिक कारणे देखील यामध्ये भूमिका बजावतात.
- काही विशिष्ट आजार किंवा वैद्यकीय स्थिती, जसे नेवस सेबेशियस सिंड्रोम, त्वचेचा कर्करोग किंवा न्यूरोफायब्रोमॅटोसिस, यांमुळेही बर्थमार्क तयार होऊ शकतात.
बर्थमार्क काढता येतात का?
जर त्वचेवर असलेला बर्थमार्क तुम्हाला दूर करायचा असेल, तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. घरगुती उपायांनी बर्थमार्क काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, कारण त्यामुळे संसर्ग किंवा इतर त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. खासकरून ज्या बर्थमार्कमुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत डॉक्टर बर्थमार्क काढण्याचा सल्ला देतात.
डॉक्टर बर्थमार्कची तपासणी करून तुमच्यासाठी कोणता उपचार सुरक्षित आणि योग्य आहे, हे ठरवतात. साधारणपणे मुलांमधील बर्थमार्कवर उपचार ६ वर्षांनंतर केले जातात. मात्र, जर बर्थमार्कमुळे मुलाच्या डोळ्यांची दृष्टी, श्वासोच्छ्वास किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या कार्यावर परिणाम होत असेल, तर उपचार त्याआधीही केले जाऊ शकतात.
