Join us

रात्रीच्या जेवणात अजिबात करु नका ३ चुका, वजन कमी करायच्या नादात तब्येतीची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2024 18:50 IST

Avoid 3 mistakes in dinner : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात

रात्रीचे जेवण लवकर करावे, रात्री कमी आणि हलका आहार घ्यावा असे आपण रात्रीच्या जेवणाबाबतचे बरेच नियम ऐकतो. मात्र त्या सगळ्या गोष्टी पाळणे शक्य होतेच असे नाही. दिवसभर दमल्याने अनेकदा रात्री दणकून भूक लागलेली असते. तसेच ऑफीसच्या वेळांमुळे रात्रीच्या जेवणाला अनेकांना बराच उशीर होतो. काही जण वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असल्याने रात्रीचा आहार स्वत:च्या मनानेच ठरवतात. या सगळ्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. चुकीच्या गोष्टी केल्याने वजन कमी तर होत नाहीच उलट ते आहे त्यापेक्षा जास्त वाढते. म्हणून रात्रीच्या जेवणाबाबत काही गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया (Avoid 3 mistakes in dinner)...

१. जेवणात फळे खाणे 

बरेच जण रात्री हलका आहार घ्यायचा म्हणून रात्रीच्या वेळी फळं खातात. पण फळांमध्ये असणारे एन्झाईम्स कॉफीप्रमाणे काम करतात. फळं ही दिवसाच्या वेळात खायला हवीत. सकाळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी फळं खाल्लेली केव्हाही जास्त चांगली. पण सूर्यास्तानंतर फळं खाणं योग्य नाही. फळांमुळे शरीरातील ग्लुकोज वाढण्याचीही शक्यता असते. रात्री झोपताना ग्लुकोज वाढणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळं खाणं योग्य नाही. 

२. स्टार्च असलेले पदार्थ

रात्रीच्या जेवणात शक्यतो स्टार्च असलेले किंवा कार्बोहायड्रेटस असलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. पास्ता, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे पदार्थ खाऊ नयेत. तळलेल्या पदार्थांमुळे अॅसिडीटी वाढण्याची शक्यता असते. 

३. सॅलेड म्हणून चुकीच्या भाज्या खाणे 

रात्रीच्या जेवणात सॅलेड हवे म्हणून अनेक जण सॅलेडचा समावेश करतात. पण ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या पचण्यासाठी बराच जास्त वेळ लागत असल्याने त्या रात्रीच्या वेळी खाणे टाळलेले केव्हाही जास्त चांगले. 

काय खावे? 

१. व्हेजिटेबल सूप

२. मिलेट खिचडी

३. डाळ खिचडी

४. पुलाव

५. वरण भात   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना