आजकाल तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे, जी खूप चिंतेची बाब आहे. पूर्वी हार्ट अटॅक वृद्ध व्यक्तींना यायचा, परंतु आता कोणत्याही वयोगटातील लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. हार्ट अटॅकने अनेकांचा जीव घेतला आहे. याच दरम्यान, फिटनेस कोच आणि इन्फ्लुएन्सर प्रियंका मेहताने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे जी सर्वांचं लक्ष वेधत आहे. व्हिडिओमध्ये ती दावा करते की, सततच्या रागामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. हार्वर्डच्या एका अभ्यासाचा हवाला देत, तिने वारंवार राग येत असल्यास धोक्यांबद्दल इशारा देखील दिला.
हार्वर्डच्या रिसर्चनुसार, जेव्हा आपण अत्यंत मानसिक आणि भावनिक स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरात काही बदल होतात. हे बदल हृदयावर देखील परिणाम करू शकतात आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी करू शकतात, ज्याला इस्कीमिया म्हणतात. जर एखाद्याला आधीच हृदयरोग असेल, तर स्ट्रेस हार्ट अटॅकचा धोका दुप्पट करू शकतो. २०२० च्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की राग, चिंता किंवा दुःख यासारख्या अचानक इमोशनल ट्रिगरमुळे हृदयाशी संबंधित घटना घडू शकतात. एड्रेनालाईन आणि कोर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोनमुळे ब्लड प्रेशर, हृदयाची गती आणि रक्त गोठणं वाढतं, जे हार्ट अटॅकसाठी ट्रिगर असू शकतं.
२०२१ च्या JAMA मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात राग आणि हार्ट अटॅकच्या जोखमीतील संबंध देखील दृढ झाला. संशोधकांनी सुमारे पाच वर्षे ९१८ कोरोनरी हार्ट पेशेंटला फॉलो केलं. त्यांना आढळलं की, मानसिक ताणामुळे इस्कीमिया झालेल्यांना हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्त होती. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्योर होण्याची शक्यता दुप्पट होती. ज्यांना मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस आणि इस्कीमिया दोन्ही अनुभवलं होतं त्यांना जवळजवळ चार पटीने जास्त धोका होता.
पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास
मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील न्यूक्लियर कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. अहमद तवाकोल यांच्या मते, "स्ट्रेस हृदयाच्या सर्वात लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो, ही स्थिती पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक पाहायला मिळते." २०२२ च्या एका रिव्ह्यू स्टडीमध्ये अनेक रिसर्चचा आढावा घेण्यात आला आणि असं आढळून आलं की राग आणि स्ट्रेस हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.
रागावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं
दिल्लीस्थित इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. गीता प्रकाश म्हणतात की, "फक्त राग हा हार्ट अटॅक येण्याचं कारण नाही, परंतु त्यामुळे हृदयावर ताण वाढू शकतो, विशेषतः ज्यांना आधीच धोका आहे. हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, धूम्रपानसारख्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक अधिक संवेदनशील असतात. रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. राग आणि स्ट्रेस दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहे. संतुलित आहार, रोज व्यायाम, योग आणि मेडिटेशन यासारख्या सवयी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात."