Always Cold Causes : सगळीकडेच आता थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे लोक घराबाहेर पडायलाही घाबरू लागले आहेत. या काळात स्वतःला थंडीपासून संरक्षण देण्यासाठी लोक अनेक गरम कपडे, ब्लॅंकेटचा यांचा वापर करतात. हिवाळा सुरू होताच थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. मात्र, काही लोकांना हातमोजे आणि मोजे घातल्यानंतरही हात-पाय कायम थंड राहण्याची समस्या असते. बहुतेकदा लोक हे सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण कधी कधी हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकतं. तर जाणून घेऊया, हात-पाय थंड राहणे नेमके कधी धोकादायक ठरू शकतं?
हात-पाय का थंड राहतात?
हात-पाय थंड राहणे हे बहुतेक वेळा हवामानातील थंडीचं लक्षण असतं. हे तुमच्या शरीराला थंडीची जाणीव करून देण्याचे पहिले चिन्ह असू शकते. शरीराच्या उर्वरित भागांच्या तुलनेत हात-पाय हे शरीरापासून दूर असतात, त्यामुळे ते आधी थंड पडतात. शरीरातील अंतर्गत अवयव आपल्याला उष्णता देतात, परंतु हात-पायांमध्ये मोठे अवयव किंवा स्नायू नसल्याने ते लवकर उष्ण होत नाहीत.
महिलांचे हात-पाय जास्त थंड का राहतात?
हात-पाय थंड राहण्याचे कारण तर आपल्याला समजलं. पण ही समस्या महिलांमध्ये अधिक का आढळते? पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हात-पायांमधील ब्लड व्हेसल्स थंडीत अधिक वेगाने आकुंचन पावतात. यामुळे महिलांच्या हात-पायांत रक्तप्रवाह कमी होऊन ते अधिक थंड पडतात. मुलांमध्ये, कमी वजन असलेल्या व्यक्तींमध्ये तसेच वृद्धांमध्येही स्नायू आणि चरबी कमी असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यांचे हात-पायही जास्त थंड राहतात.
हात-पाय थंड राहणे कधी धोकादायक?
सामान्य परिस्थितीत हात-पाय थंड राहणे हानिकारक नसते, परंतु काही वेळा हे आरोग्यासाठी चिंताजनक ठरू शकते. सतत हात-पाय थंड राहणे हे रेनॉड सिंड्रोमचे लक्षण असू शकते. या स्थितीत थंड हवामान किंवा ताणामुळे हात-पायांच्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो.
ही स्थिती साधारणपणे निरुपद्रवी असते, परंतु काही वेळा ल्यूपस किंवा स्क्लेरोडर्मा यांसारख्या गंभीर ऑटोइम्यून आजारांचे कारण होऊ शकते.
हात-पाय थंड होण्याची इतर कारणे
रक्तातील गाठी
पेरिफेरल आर्टरी डिसीज
रक्तवाहिन्यांचे संकुचन
हायपोथायरॉयडिझम
अॅनिमिया
डॉक्टरकडे कधी जावे?
तज्ञांच्या मतानुसार, अचानक हात-पाय थंड पडायला लागले किंवा अलीकडे ही समस्या वाढली असेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. हात-पायांमध्ये तीव्र वेदना, जखमा, पापुद्रे येणे किंवा अल्सर तयार होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास लगेच विशेषज्ञांचा सल्ला घ्यावा.
