आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. काही गोष्टींबद्दल आपल्याला माहीत असतं. पण काही गोष्टी आश्चर्यकारक असतात. ज्या समजल्यावर आपणंही हैराण होतो. रिसर्चमधून असाच एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी संवाद साधतात असं जर कोणी सांगितलं तर आपला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ड्यूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अभूतपूर्व शोध लावला आहे. एक अज्ञात न्यूरल मार्ग शोधला आहे जो आतड्यातील बॅक्टेरियांना मेंदूला रिअल-टाइम सिग्नल पाठविण्यास परवानगी देतो. यामध्ये भूक, आपलं वागणं आणि अगदी मानसिक आरोग्य कसं असेल याचा संबंध आहे.
नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये 'न्यूरोबायोटिक सेन्स' नावाच्या नव्या सिस्टमबद्दल खुलासा करण्यात आला आहे. हा सिक्स सेन्स न्यूरोपॉड्सवर अवलंबून आहे ज्या आतड्यातील विशेष पेशी असून सूक्ष्मजीव एक्टिव्हिटी शोधतात. या पेशी फ्लॅगेलिनला प्रतिसाद देतात, जे विशिष्ट आतड्यातील बॅक्टेरियाद्वारे सोडलं जाणारं प्रोटीन आहे आणि व्हॅगस नर्व्हद्वारे मेंदूला त्वरित सिग्नल पाठवतात. याचा परिणाम म्हणजे ते थेट मेंदूला खाणं थांबवण्याचा संकेत देतात.
उंदरांवर याचं टेस्टिंग करण्यात आलं. फ्लॅगेलिनमुळे भूक कमी होते, जोपर्यंत प्राण्यांमध्ये TLR5 रिसेप्टरची कमतरता नव्हती, जो सूक्ष्मजीव सिग्नलसाठी अँटेना म्हणून काम करतो. पण हे नसेल तर मेंदूला कधीही संदेश मिळत नाही, ज्यामुळे जास्त खाणं होतं. याचे परिणाम खूप आहेत. या रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, आपल्या आतड्यांतील बॅक्टेरिया केवळ पचनावरच नव्हे तर आपल्या वागण्यावर, भावनांवर आणि शक्यतो मानसिक स्थितींवरही परिणाम करू शकतात.
आतड्यांतील काही गोष्टींमध्ये बदल करून किंवा या मज्जातंतू मार्गांना लक्ष्य करून भविष्यात मेंदूवर थेट प्रभाव न टाकता लठ्ठपणा, नैराश्य किंवा चिंता यावर उपचार करू शकता येतात. आतडे आणि मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत हे आपल्याला फार पूर्वीपासून माहित आहे. मात्र आता आतड्यांतील बॅक्टेरियाद्वारे जलद, समर्पित मज्जातंतू सर्किटच्या मदतीने आपल्या वागण्याला आकार मिळत असल्याचा हा पुरावा आहे.