कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये तयार करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पण जीवनशैली बदललेली असताना, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय आणि ताणतणाव यांच्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीराला शांतपणे पण हळूहळू त्रास देऊ लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कसे आणि का वाढते, ते वाढल्यावर शरीराला काय त्रास होतो आणि ते संतुलित कसे ठेवावे, हे जाणून घेणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे.
आजची आहारपद्धती हे कोलेस्टेरॉल वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. तळलेले पदार्थ, बटर, चीज, क्रीम, जास्त तेलात केलेले पदार्थ आणि पॅकेज्ड स्नॅक्स यांचे सेवन वाढल्याने वाईट म्हणजे LDL कोलेस्टेरॉल शरीरात साठू लागते. काही वेळा अनुवंशिक कारणामुळेही काही लोकांचे कोलेस्टेरॉल सहज वाढते. त्यातच व्यायामाचा अभाव, दिवसभर एका जागी बसून राहणे, धूम्रपान, मद्यपान, ताण, हार्मोनल बदल आणि झोप कमी होणे या गोष्टी त्याला आणखी खतपाणी घालतात.
कोलेस्टेरॉल वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर तयार होऊ लागतात आणि वाहिन्या अरुंद होऊ लागतात. यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा प्रवाह मंदावतो. पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, श्वास लागणे, छातीत जडपणा अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. काहींना पायात मुंग्या येणे, वारंवार थकवा जाणवणे किंवा अचानक दम लागणे ही लक्षणेही दिसू शकतात, पण बहुतांश वेळा लक्षणे दिसेपर्यंत नुकसान मोठे झालेले असते.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार हा सर्वात प्रभावी उपाय आहे. ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे, कडधान्ये, ओट्स, जवस, चिया सीड्स, अक्रोड, बदाम यांसारखे फायबर आणि चांगले फॅट्स असलेले पदार्थ रक्तवाहिन्यांना स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. शेंगदाणा तेल किंवा ऑलिव्ह ऑईलसारखे हलके तेल वापरल्यास फायदा होतो. तळलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, मिठाई, चीज, बटर आणि अति तेलकट पदार्थ मात्र शक्य तितके टाळले पाहिजेत. आठवड्यातून काही वेळा मिश्र धान्याचा वापर, डाळ आणि सूप - सॅलेडचा समावेश कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतो.
आहाराबरोबर सवयींमध्ये बदलही तितकाच महत्त्वाचा आहे. रोज किमान तीस मिनिटे चालणे, हलका व्यायाम, योगा किंवा सायकलिंग केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते. ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यानधारणा किंवा श्वसनक्रिया उपयुक्त ठरतात. धूम्रपान पूर्णपणे सोडणे आणि मद्यपान टाळणे हृदयासाठी मोठे रक्षण ठरते. पुरेशी झोप घेणे, जेवताना घाई न करणे, रात्री जड पदार्थ टाळणे आणि दिवसभरात पाणी पुरेसे पिणे या साध्या सवयी दीर्घकाळ फायदा देतात.
