देशातील कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (CDSCO) मोठं पाऊल उचललं आहे. भारतातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक कफ सिरप उत्पादक कंपन्यांचं ऑडिट पूर्ण झालं असून पुढील सीझनपर्यंत या औषधांमधील सर्व त्रुटी दूर होतील असा विश्वास भारताचे औषध महानियंत्रक (DCGI) राजीव सिंह रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत पार पडलेल्या 'ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी समिट'मध्ये रघुवंशी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देशात कफ सिरप तयार करणाऱ्या सुमारे १,३०० कंपन्यांपैकी १,२५० हून अधिक (९०% पेक्षा जास्त) कंपन्यांच्या उत्पादन केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली आहे. आता कंपन्यांचे ऑडिट सुधारित 'गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस' (GMP) आणि मानकांनुसार राज्य व केंद्र अशा दोन्ही स्तरांवरील यंत्रणांकडून केलं जात आहे.
'जोखीम आधारित तपासणी' (Risk-based inspection) मोहिमेत ज्या कंपन्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या, त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. गुणवत्ता नियंत्रण आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी औषध प्रशासनाने गेल्या १० महिन्यांत सुमारे ८५० सुधारात्मक आणि निवारक कारवाई (CAPA) नोटिसा जारी केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप एकाही नोटीसवर समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही असं रघुवंशी यांनी नमूद केलं.
"आम्ही ज्या पद्धतीने तपासणी आणि कारवाई करत आहोत, ते पाहता पुढील सीझनपर्यंत कफ सिरप निर्मितीमधील सर्व त्रुटी दूर होतील आणि आपण या समस्यांपासून मुक्त होऊ" असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कफ सिरपमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी कफ सिरपमुळे २५ मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. 'कोल्ड्रिफ' नावाचं हे कफ सिरप तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील 'स्रेसन फार्मास्युटिकल्स' या कंपनीने तयार केलं होतं, जे जीवघेणं ठरलं.
