उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये खेळत असताना एका सात वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबात खळबळ उडाली होती. रिपोर्टनुसार, ती सकाळी ११ च्या सुमारास शाळेत खेळत होती. याच दरम्यान छातीत दुखू लागल्याने ती तिथेच खाली कोसळली. लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक हा अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु हे काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकतं.
कार्डियोलॉजिस्ट्सच्या मते, आजकाल लहान मुलं कोणतंही शारीरिक काम करत नाहीत, ते फास्ट फूड कल्चरमध्ये वाढत आहेत. याशिवाय अभ्यासाचाही त्यांच्यावर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा मुलाच्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतो. आजकाल मुलं कमी चालतात आणि कमी खेळतात, हेच हार्ट अटॅकचं कारण बनत आहे.
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी मुलांची अशी घ्या काळजी
फॅमिली हिस्ट्री असल्यास काळजी घ्या
घरातील व्यक्तीला हार्ट अटॅकचा त्रास असेल तर अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांमध्ये हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून निष्काळजीपणा टाळा. सुरुवातीला त्याबाबत निष्काळजीपणा केला जातो पण नंतर ती मोठी समस्या बनते.
लठ्ठपणामुळे मुलांना हार्ट अटॅकचा धोका
लठ्ठपणा हे मुलांमध्ये हार्ट अटॅकचं सर्वात मोठं कारण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणामुळे श्वसनाचा त्रास, मधुमेह आणि इतर आजार होऊ शकतात. पालक योग्य वेळी गंभीर झाले नाहीत तर मुलाच्या अडचणी वाढू शकतात.
हृदयविकाराचा त्रास असेल तर सावध राहा
कार्डियोलॉजिस्ट्सचं म्हणणं आहे की, जर मुलाला हृदयविकाराचा गंभीर आजार असेल तर त्याचं फॉलोअप करत राहा. डॉक्टरांना वेळोवेळी भेट द्या आणि औषधे आणि सल्ला घ्या. मुलांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.
अभ्यासाचा ताण
अनेक पालक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, जे मुलांसाठी चांगलं नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या समाजात अभ्यासाबाबत खूप ताण आहे. मुलं घराबाहेर पडून चुकीच्या गोष्टी खातात, काहीवेळा ते लहान वयातच अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडतात, अभ्यासाचा ताणही घेतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.