Join us

ना दारु- ना सिगारेट तरीही फिटनेस फ्रीक तरुणाचा गेला जीव, डॉक्टरांनी सांगितलं कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:25 IST

Heart Disease : २९ वर्षीय तरूण रोहन पूर्णपणे फिट दिसत होता. पण तो वर्कआउट करताना अचानक बेशुद्ध पडला. नंतर समोर आलं की, त्याला हृदयासंबंधी एक आजार होता.

Heart Disease : फिट आणि निरोग राहण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, असा सल्ला नेहमीच हेल्थ एक्सपर्ट देत असतात. पण काही वेळा शरीरात अशा काही समस्या लपून बसलेल्या असतात, ज्या अचानक समोर येतात आणि मोठा धोका निर्माण होतो. एका डॉक्टरांनी अलिकडे एका अशाच धक्कादायक केसबाबत खुलासा केला आहे. 

ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ. शगुन अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून या केसबाबत माहिती दिली. ज्यात त्यांनी सांगितलं की, २९ वर्षीय तरूण रोहन पूर्णपणे फिट दिसत होता. पण तो वर्कआउट करताना अचानक पडला. नंतर समोर आलं की, त्याला हृदयासंबंधी एक आजार होता. ज्याचा त्याला पत्ताही नव्हता. वर्कआउट दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कसा गेला रोहनचा जीव?

डॉक्टरांनी पोस्टमध्ये लिहिलं की, रोहनचं वय २९ होतं, आयटी सेक्टरमध्ये नोकरी करत होता. आठवड्यातील ६ दिवस जिमला जात होता. स्मोकिंग करत नव्हता आणि दारूही पित नव्हता. रोहन खूप फिटनेस फ्रीक होता. अनहेल्दी फूड्सही खात नव्हता. एक दिवस जिममध्ये इंक्लाइन डंबल प्रेस करताना तिसऱ्या सेटमध्येच त्याचे हात गळून गेले, वेट जमिनीवर पडलं आणि तो स्वत:ही पडला. आधी कुणाच्या काहीच लक्षात आलं नाही. त्याला सीपीआर देण्यात आला, अ‍ॅम्बुलन्स बोलवण्यात आली. पण त्याने प्राण सोडले होते. 

कोणता आजार होता?

नंतर हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (HCM) हा आजार होता. यात हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड होतात. हेच हार्ट अरेस्टचं कारण ठरलं. इतकंच नाही तर त्याच्या शरीरात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमची कमतरता देखील होती. तो हाय कॅफीन फॅट बर्नर घेत होता. त्याने कधीही कोणत्या टेस्ट केल्या नव्हत्या. डॉक्टर म्हणाले की, आपण वरून कितीही फिट दिसत असू पण फुल बॉडी चेकअप करणं गरजेचं असतं.

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (HCM) हृदयाचा एक गंभीर आजार आहे. ज्यात हृदयाचे स्नायू जाड होतात. Hypertrophic चा अर्थ एखादी गोष्ट सामान्यापेक्षा मोठी होणे. तेच Cardiomyopathy अशा आजारांचा समूह असतो, ज्यामुळे हृदयाचे स्नायू प्रभावित होतात. 

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीची लक्षणं?

वर्कआउट करताना अचानक चक्कर

विनाकारण दम लागणे

हृदयाचे ठोके वाढणं किंवा अनियमित होणे

छातीत वेदना किंवा दबाव जाणवणे

अचानक बेशुद्ध पडणे

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाआरोग्यहेल्थ टिप्स