lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

घरच्या घरी स्तन तपासणी करता येते, न घाबरता ती करणं, गाठ आढळ्यास डॉक्टरांकडे जाणं हा सतर्क टप्पा महत्त्वाचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 03:42 PM2021-05-11T15:42:08+5:302021-05-11T15:45:17+5:30

घरच्या घरी स्तन तपासणी करता येते, न घाबरता ती करणं, गाठ आढळ्यास डॉक्टरांकडे जाणं हा सतर्क टप्पा महत्त्वाचा.

Breast Self-Exam: Breast cancer and precautions | Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

डॉ.शंतनु अभ्यंकर


ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार, विखार आणि प्रसार कसा तपासला जातो, ते आपण मागील लेखात पहिले. आता उपचाराबद्दल थोडे-फार. इथे जे लिहिले, ते फार थोडे आहे, याची जाणीव मला आहे, आपणही बाळगावी, ही नम्र विनंती.
स्थानबद्ध आणि फार न पसरलेला कॅन्सर असेल, तर तर स्तन उच्चाटन (स्तन काढून टाकणे) आणि स्तन-जतन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. स्तन-जतन जमले नाही, तर स्तन पुनर्घटन (Breast Reconstruction) जमवता येते. त्या उंबऱ्यावरच्या लसिका ग्रंथीही काढून तपासल्या जातात. (Sentinel Lymph Node Biopsy) पुढे शिल्लक चुकार पेशी नष्ट करायला शेक दिला जातो, केमोथेरपी दिली जाते किंवा संप्रेरक-सदृष औषधे दिली जातात. निवड ही इतर अनेक घटकांवर ठरते. अर्थातच, कॅन्सरचा प्रकोप जितका जास्त, तितके उपचार आणि सुटका कठीण. आता कॅन्सर पुन्हा डोके वर काढेल का नाही, याचा काही निर्देशांक काढता येतो. २१ निरनिराळे घटक मोजून (21 gene test Oncotype DX / MAMMAPRINT) ही कुंडली मांडली जाते.
कॅन्सरबद्दल खूपच काही सांगण्यासारखं आहे. कर्कविद्या ही तर वेगळी शाखाच आहे वैद्यकीची. त्यातही आता फक्त ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करणारे तज्ज्ञ आहेत! म्हणजे मनुष्य पीडेच्या या एवढ्याशा कोपऱ्यातही किती बारकावे असतील बघा. या लेखातून शिकण्यासारखी एकच गोष्ट. स्वतःची स्वतः स्तन तपासणी कशी करायची, हे समजावून घेणे आणि तसे खरोखरच करणे.


स्तनांची तपासणी


स्वतःची स्वतः तपासणी करायची सवय लावून घ्यायला हवी. आपले स्तन हे नेमके हाताला जाणवतात तरी कसे, याचा परिचय असायला हवा, तरच शंकास्पद काही सापडेल.
अनेक कारणांनी स्तनाचा स्पर्श, आकार, उकार आणि उभार बदलतो. कॅन्सर क्वचित असतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. सापडली गाठ की लावला डोक्याला हात, मारली फतकल आणि काढला गळा; असं होणार असेल तर पुढे वाचूच नका! नाहीतर भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी गत व्हायची.
गाठ लागली की, पुढे काही ना काही तपासणी केल्याशिवाय नेमके निदान होणार नाही. सोनोग्राफी, मॅमोग्राफी, प्रसंगी नमुना तपासणी वगैरे करावे लागू शकते. यात काही आठवड्यांचा काळ लागू शकतो. दरम्यान, बेचैनी, चिंता, काळजी वगैरे ग्रासून टाकू शकते आणि हे सर्व नॉर्मल आले की, उगीचच यात पडलो, अशी हताशाही वाटू शकते. तेव्हा सावधान! पण जगभरचा अनुभव असं सांगतो की, कॅन्सरच्या शंकेची सुरुवात ही बरेचदा त्या स्त्रीला स्वतःलाच आढळलेल्या गाठीपासून होते आणि ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हा मंत्र आपण वर पहिलाच आहे.
पहिली पायरी, स्तनाच्या गाठीकडे फक्त पाहाणे. आरशासमोर उभे राहून दोन्ही स्तन समान दिसताहेत ना, त्यांचा आकार, उकार, उभार समसमान आहे ना, कुठे अनाठायी सुरकुत्या, सूज, खळगा वगैरे तर दिसत नाही ना, हे नीट पाहायचं आहे. दोन्ही निपलही न्याहाळायची आहेत. हात बाजूला सोडून, कर कटेवर असं उभं राहून, हात डोक्यावर धरून; कमरेवर डोक्यावर हाताने दाब देत असताना; असं विविध अवस्थांत तपासायचं आहे.
पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष हात लावून तपासणी. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की, तपासणी हातच्या तळव्याने करायची आहे. चिमटीत धरून जर स्तनाची गाठ दाबून पहिली, तर तीत गाठीच गाठी आहेत, असं जाणवेल. हे नॉर्मल आहे. चपट्या हाताला लागेल ती गाठ महत्त्वाची, फक्त चिमटीत लागते आणि तळव्याला नाही ती बिन महत्त्वाची. अशी तपासणी अंघोळीच्या वेळी साबणानी हात बुळबुळीत असताना करणं सगळ्यात सोप्पं. उताणे झोपूनही, स्तनाची गाठ पसरट होते आणि अशी तपासणी सोपी होते. पाळीच्या आसपास स्तन हुळहुळे होतात, तेव्हा असा काळही टाळावा.
स्तनाचे चार भाग कल्पून, एकेका चतकोरावर, तळवे गोल गोल फिरवून तपासणी करावी. आधी हलकेच आणि मग नीट दाब देऊन तपासणी करावी. चारही चतकोर झाले की, मध्यापासून सुरू करत पुनः गोल गोल तपासत कडेपर्यंत जावे. वेळ लागला तरी चालेल, पण नीट तपासणे महत्त्वाचे आहे.
काही वावगं आढळलं, तर पुढील तपासणी महत्त्वाची आहे. पुढे सुयोग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळणार असतील, तरच या कृतीला काही अर्थ आहे. हे वाचून चाचपणी तर अनेक जणी करतील, पण पुढील शास्त्रीय आणि खिशाला परवडतील, असे औषधोपचार अजूनही सहज सोपे नाहीत, हे वास्तव आहे.


(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: Breast Self-Exam: Breast cancer and precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.