Join us

Best Cooking Oil : स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं, कोणतं तब्येतीला उत्तम,कसं ठरवाल? आहारतज्ज्ञ देतात मोलाचा सल्ला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:20 IST

Best Cooking Oil : एखादं तेल वापरुन आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं का? तेल वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? याविषयी आहारतज्ज्ञ सांगतात...

ठळक मुद्दे रिफाईंड ऑइलपेक्षा ट्रिपल फिल्टर्ड ऑइल वापरलेले आरोग्यासाठी केव्हाही चांगले. डालडा, मार्गारीन, पाम तेल शक्यतो वापरू नये आणि स्वयंपाकासाठी खोबरेल तेलही अगदीच कधीतरी वापरले तर चालू शकेल. 

रोजच्या स्वयंपाकाला कोणतं तेल वापरायचं? कोणत्या तेलाने आपल्या आरोग्याला त्रास होणार नाही असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. त्यातही टिव्हीवर किंवा अगदी मोबाइलवरही आपण रोज नवनवीन जाहिरातीत अमुक एखादं तेल कसं चांगलं आहे हे वाचत, ऐकत असतो. तुमच्या हृदयाचं आरोग्य सांभाळेल, तुम्हाला तरुण, ताजंतवानं ठेवेल अशा जाहिराती केल्या जातात. मात्र तरीही हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि शरीर दिर्घकाळ उत्तम पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी कोणतं तेल चांगलं Best Cooking Oil असा गोंधळ आपल्या डोक्यात कायम असतो. असं एखादं तेल वापरुन आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं का? तेल वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? याविषयी आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर सांगतात....

१. उत्तम आरोग्यासाठी नियंत्रित प्रमाणात तेल रोजच्या आहारात वापरायलाच हवं. भाजी, आमटीला फोडणी देण्यासाठी ४ व्यक्तींकरीता २ लहान चमचे तेल पुरेसे असते. पण तेल जास्त घातल्यास पदार्थ चांगला होईल असे वाटल्याने आपण जास्त प्रमाणात तेल वापरतो. तेच पोळ्यांची कणीक मळताना किंवा पोळीला तेल लावताना लक्षात ठेवायला हवे. पोळी मऊ हवी असेल तर फक्त तेल लावल्यानेच ती मऊ होते असे नाही. त्यामुळे तिथेही तेल प्रमाणातच वापरलेले केव्हाही चांगले. त्याचप्रमाणे सतत तळलेले पदार्थ खाणे टाळावे. 

२. तेल फॅटी असिड्सच्या संयोगाने तयार होतं. प्रत्येक तेलात मुफा, पुफा आणि सॅच्युरेटेड फॅटी असिड्स असतात, जी आपल्याला आवश्यक असतात. काही तेलांत मुफाचं प्रमाण जास्त तर काहींत पुफा जास्त. काहीं मध्ये प्रामुख्याने सॅच्युरेटेड फॅट्स असतात. कोणत्याही एका तेलात तिन्हींचं आदर्श प्रमाण नसतं. म्हणूनच एकच एक तेल न वापरता सर्व तेलं आलटून पालटून वापरावीत. दर १५ दिवसांनी तेल बदलावं. 

३. आपल्याकडे शेंगदाणा तेल सर्रास वापरलं जात होतं. पण गेली काही वर्षे तेल कंपन्यांनी केलेल्या चुकीच्या जाहिरातीमुळे अनेकांनी ते वापरायचं थांबवून सूर्यफुलाचं तेल वापरायला सुरुवात केली. खरं तर शेंगदाणा, सोयाबीन, करडई, सूर्यफूल, राईस ब्रान आणि मोहरीचं तेल ठराविक काळाने आदलून-बदलून वापरावं. 

४. ऑलिव्ह ऑइल वापरायची लाट मध्ये आली होती. हे तेल स्वयंपाकासाठी वापरणं चांगलं असलं तरी फक्त ते एकच तेल वापरणे योग्य नाही. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सॅच्युरेटेड तेल मात्र खूप कमी प्रमाणात वापरावेत. म्हणूनच डालडा, मार्गारीन, पाम तेल शक्यतो वापरू नये आणि स्वयंपाकासाठी खोबरेल तेलही अगदीच कधीतरी वापरले तर चालू शकेल. 

५. दिवसभरात एका व्यक्तीसाठी सर्वसाधारणपणे ३ ते ४ चमचे तेल वापरावं. अनेक जण आम्ही घाण्याचं तेल वापरतो असं अगदी अभिमानाने सांगतात. मात्र हे कोल्ड प्रेस्ड किंवा घाण्या वरचं तेल स्वच्छ आणि शुद्ध आहे की नाही याची खात्री केलेली असायला हवी. हल्ली घाण्यावरचे तेल म्हणून फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. तसेच रिफाईंड ऑइलपेक्षा ट्रिपल फिल्टर्ड ऑइल वापरलेले आरोग्यासाठी केव्हाही चांगले. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.