Join us
Daily Top 2 Weekly Top 5

वाढत्या वयातली मुलगी पण अगदीच किडकिडीत, वजन वाढत नाही ही चिंता? मग 'हे' खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 18:10 IST

वाढते वजन कमी होत नाही, अशी अनेक जणांची चिंता असते. पण तशीच चिंता वजन वाढत नसल्यानेही  अनेकांना सतावत असते. चिंता सोडा आणि 'हे' पदार्थ खा..

ठळक मुद्दे दूधासोबत बदाम, अंजीर, खजूर असा सुकामेवाही रोज खावा किंवा त्याची पुड करून ती दूधात टाकून उकळावी आणि असे दूध घ्यावे. यामुळे अधिक फायदा होतो.

मुलं वयात आली की त्यांच्या खाण्या- पिण्याच्या सवयी, आहार, झोपेच्या वेळा असे सगळेच बदलत जाते. याचा परिणाम तब्येतीवर होतो आणि मग मुलं अगदीच किडकिडीत दिसू लागतात. मुलांचे वजन कसे वाढवावे, यामुळे अशा मुलांच्या आई त्रस्त झालेल्या असतात. शिवाय स्लिम- ट्रिम असणं वेगळं आणि अगदीच किडकिडीत, अशक्त असणं वेगळं. म्हणूनच आपल्या मुलांचे वजन कसे वाढवावे, त्यांना तब्येतीने सशक्त कसे बनवावे, म्हणून विचारात पडला असाल, तर काही खास पदार्थ मुलांना आवर्जून खायला द्या. त्यांचे वजन तर वाढेलच पण ते सशक्त आणि निरोगीदेखील होतील. 

 

तब्येत सुधारण्यासाठी हे पदार्थ खा १. केळी  रोज एक केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. केळ खाण्याने तब्येत सुधारून आरोग्याला अनेक लाभ होतात. याशिवाय केळामध्ये खूप जास्त कॅलरीज आणि फ्रुक्टोज असते. त्यामुळे उर्जा मिळण्यासाठी केळ खाणे खूप चांगले आहे. केळामध्ये कोणत्याही फळापेक्षा अधिक प्रमाणात फ्रुक्टोज असते.

 

२. मणुके आजारातून उठलेल्या व्यक्तीला पिवळे मणूके देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. मणूके जर रोज नियमितपणे खाल्ले तर वजन वाढण्यास खूप फायदा होतो. एका तव्यावर एक टीस्पून तूप टाकून त्यामध्ये १० ते १५ मणूके परतावेत आणि खायला द्यावेत. यामुळे अधिक फायदा होतो. मणुक्यांसोबत आरोग्यवर्धक तूपदेखील पोटात जाते. 

 

३. दूध आणि सुकामेवा तब्येत सुधारण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वजन कमी करायचे असल्यास लो फॅट असणारे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र वजन वाढवायचे असेल तर फुल फॅट दूध प्यावे. आयुर्वेदामध्ये दुधाला पुर्ण अन्न म्हणून संबोधले जाते. त्यामुळे रोज एक ग्लास दूध घेतल्यास निश्चितच चांगले वजन वाढेल. दूधासोबत बदाम, अंजीर, खजूर असा सुकामेवाही रोज खावा किंवा त्याची पुड करून ती दूधात टाकून उकळावी आणि असे दूध घ्यावे. यामुळे अधिक फायदा होतो.

 

४. फुटाणे आणि गुळ फुटाण्यांमध्ये प्रोटीन, लोह, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वजन वाढीसाठी गुळ- फुटाणे एकत्र करून खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. त्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींनाही नियमितपणे गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो. 

 

५. उकडलेले बटाटे बटाट्यांमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि कॉम्प्लेक्स शुगर असते. त्यामुळे ते वजन वाढीसाठी खूपच फायदेशीर ठरतात. वयात आलेल्या मुलामुलींना उकडलेला बटाटा नाश्त्यामध्ये खाण्यास द्यावा. उकडलेल्या बटाट्यावर चाट मसाला टाकावा आणि वरून चीज किसून टाकावे. असे केल्याने त्याची चवदेखील खूपच छान लागते आणि मग मुलं असा चटपटीत पदार्थ पटापट खातात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपौष्टिक आहारअ‍ॅनिमिया